दिनेश मोंगियाची निवृत्तीची घोषणा

टीम इंडियाच्या या ऑलराऊंडरने निवृत्तीची घोषणा केली आहे. 

Updated: Sep 18, 2019, 10:52 AM IST
दिनेश मोंगियाची निवृत्तीची घोषणा

मुंबई : टीम इंडियाकडून खेळलेल्या ऑलराऊंडर दिनेश मोंगियाने निवृत्तीची घोषणा केली आहे. दिनेश मोंगियाने क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमधून संन्यास घेतला आहे. २००३ वर्ल्ड कपच्या उपविजेता भारतीय टीमचा मोंगिया सदस्य होता. दिनेश मोंगियाची आंतरराष्ट्रीय कारकिर्द ५ वर्ष चालली, पण या कालावधीमध्ये त्याला नियमित संधी मिळाली नाही.

मोंगियाने त्याची पहिली आंतरराष्ट्रीय मॅच २००१ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली, तर शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच २००७ साली बांगलादेशविरुद्ध खेळली. २००७ मध्येच प्रथम श्रेणी मॅच खेळल्यानंतर तो आयसीएलमध्ये खेळायला गेला. आयसीएल खेळल्यामुळे बीसीसीआयने त्याच्यावर बंदी घातली. ५७ वनडेमध्ये दिनेश मोंगियाने १,२३० रन केले आहेत. तसंच त्याने वनडेमध्ये १४ विकेटही घेतल्या.

दिनेश मोंगियाने त्याच्या कारकिर्दीत एकमेव आंतरराष्ट्रीय टी-२० मॅच खेळली. २००६ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्गमध्ये झालेली भारताचीही ती पहिलीच आंतरराष्ट्रीय टी-२० मॅच होती.

दिनेश मोंगियाच्या नावावर वनडेमध्ये एकमेव शतक आहे. गुवाहाटीमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध मोंगियाने नाबाद १५९ रनची खेळी केली. यामध्ये १७ फोर आणि एक सिक्सचा समावेश होता. आपल्या कारकिर्दीत एकही टेस्ट न खेळलेल्या दिनेश मोंगियाने लँकशायर आणि लिसेस्टरशायरकडून काऊंटी क्रिकेट खेळलं.

मोंगियाची निवृत्ती ही एक औपचारिकताच होती, कारण मागच्या मोसमात मोंगिया पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीतही सामिल झाला. आयसीएल खेळणाऱ्या खेळाडूंना बीसीसीआयने माफी दिली, पण यानंतर मोंगिया क्रिकेट खेळताना दिसला नाही. २०१४ साली कबाब में हड्डी नावाच्या चित्रपटातही दिनेश मोंगियाने काम केलं, पण हा चित्रपट फ्लॉप झाला. यानंतर मोंगियाने त्याची अभिनय क्षेत्रातली कारकिर्द पुढे नेली नाही.