मुंबई : भारतीय टीमनं पारंपरिक प्रतीस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध वर्ल्डकप मध्ये खेळू नये, अशी मागणी मुंबईच्या क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने केली आहे. वर्ल्ड कप स्पर्धा म्हटल्यावर क्रिकेट चाहते भारत आणि पाकिस्तान संघाच्या सामन्याची आवर्जुन वाट पाहतात. पण गेल्या काही वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. त्यातच १४ फेब्रुवारीला पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीफचे ४० जवान शहीद झाले. यामुळे भारत आणि पाकिस्तानमधले संबंध आणखी खराब झाले आहेत.
पुलवामामध्ये झालेल्या या हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या मनात पाकिस्तानबद्दल संताप आहे. प्रत्येकानं या भ्याड हल्ल्याचा निषेधही व्यक्त केला आहे. क्रिकेट क्लब ऑफ इंडियानं लावलेला पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो झाकला आहे. इम्रान खान यांच्या फोटोऐवजी विनू मंकड यांचा फोटो लावण्यात येणार आहे. यानंतर आता वर्ल्ड कपमध्येही भारत-पाकिस्तान सामना होऊ नये, असं आवाहन सीसीआयनं केलं आहे.
५० ओव्हरच्या वर्ल्ड कपला ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानसोबत १० टीम सहभागी होणार आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये होणारा सामना १६ जूनला नियोजित आहे.
एएनआयच्या माहितीनुसार सीसीआयचे सचिव सुरेश बाफना म्हणाले की, 'आम्ही या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतो. या हल्ल्यात आम्ही जवान गमावले आहेत. सीसीआय हा एक स्पोर्टस क्लब असला तरी खेळाच्या आधी देशाला प्राधान्य आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध वर्ल्ड कप सामना खेळू नये. इम्रान खान हे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत. जर त्यांना वाटत असेल की, या भ्याड हल्ल्यात पाकिस्तानचा हात नाही. मग त्यांनी समोर येऊन या बद्दल जाहीरपणे बोलायला हवे. ते जाहीरपणे बोलत नाहीत, याचा अर्थ कुठे ना कुठे या हल्ल्यामागे पाकिस्तानचा यामागे हस्तक्षेप आहे'. भारताने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी मागणी सोशल मीडीयावर जोर धरू लागली आहे.
भारत आणि पाकिस्तान आता पर्यंत वर्ल्ड कपमध्ये सहा सामने खेळले आहेत. यातील सहाच्या सहा सामने भारताने जिंकले आहेत. या दोन्ही टीम १९९२ साली वर्ल्ड कपच्या साखळी सामन्यात पहिल्यांदा एकमेकांच्या समोर उभे ठाकले होते. यानंतर भारतीय टीमने पाकिस्तानचा १९९६ साली उप- उपांत्य सामन्यात पराभव केला होता. यापुढे १९९९, २००३, २०११ आणि २०१५ साली झालेल्या वर्ल्ड कपमधील सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केले. २०११ ला मोहाली स्टेडियममध्ये भारताने पाकिस्तानचा उपांत्य सामन्यात पराभव केला होता.