IPL 2019: गौतम गंभीरचा पुन्हा विराटवर निशाणा

यंदाच्या आयपीएल मोसमात बंगळुरूची हाराकिरी सुरुच आहे.

Updated: Apr 8, 2019, 05:34 PM IST
IPL 2019: गौतम गंभीरचा पुन्हा विराटवर निशाणा title=

मुंबई : यंदाच्या आयपीएल मोसमात बंगळुरूची हाराकिरी सुरुच आहे. या मोसमातल्या आत्तापर्यंतच्या सगळ्या ६ मॅचमध्ये बंगळुरूचा पराभव झाला आहे. यामुळे आता प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचं बंगळुरूचं स्वप्न धुसर झालं आहे. बंगळुरूच्या कामगिरीवरून त्यांच्यावर टीका होत असतानाच भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने कर्णधार विराट कोहलीवर निशाणा साधला आहे.

विराट कोहलीच्या कर्णधारपदावर गंभीरने प्रश्न उपस्थित केले आहेत. विराट कोहली हा सर्वोत्तम बॅट्समन आहे, पण तो कर्णधार म्हणून साधारण आहे. विराट कोहली हा शिकाऊ कर्णधार आहे. त्याला अजून बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत.  बंगळुरूच्या बॉलरना दोष देण्यापेक्षा विराटनं स्वत:लाच दोष द्यावा, असं रोखठोक मत गंभीरने मांडलं आहे. टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रातल्या स्तंभामध्ये गंभीरने विराटच्या कर्णधारपदावर टीका केली. 

कोलकात्याविरुद्धच्या मॅचवेळी विराट कोहलीची रणनिती चुकल्याचंही गंभीर म्हणाला. मोहम्मद सिराजने बिमर टाकल्यामुळे त्याला बॉलिंग पूर्ण करता आली नाही. सिराजच्याऐवजी विराटने टीम साऊदीला बॉलिंग दिली. पण त्या स्पिनरला मदत होत असलेल्या त्या खेळपट्टीवर विराटने पवन नेगीला बॉलिंग दिली पाहिजे होती. आंद्रे रसेलला रोखण्यासाठी फास्ट बॉलरचीच मदत घ्यायला पाहिजे असं नाही,  असं गंभीरला वाटतं. तसंच योजनेनुसार बॉलिंग करण्याचा सल्ला विराटने साऊदीला द्यायला पाहिजे होता, असंही गंभीरने सांगितलं.

याआधीही गौतम गंभीरने विराट कोहलीच्या आयपीएलमधल्या कर्णधारपदावर टीका केली होती. 'विराट कोहली हा चतूर कर्णधार नाही, त्यामुळे त्याची तुलना धोनी किंवा रोहित शर्माशी होऊ शकत नाही. कोहलीने बंगळुरू टीम प्रशासनला धन्यवाद दिले पाहिजेत, कारण तो अजूनही बंगळुरूच्या टीमसोबत आहे. स्पर्धा न जिंकणाऱ्या कर्णधारांना एवढा वेळ दिला जात नाही', असं गंभीर म्हणाला होता.

'आयपीएलमध्ये धोनी आणि रोहितने तीनवेळा ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे विराटला अजून मोठं अंतर कापायचं आहे. याबाबतीत तुम्ही विराटची तुलना रोहित किंवा धोनीशी करु शकत नाही,' असं वक्तव्य गंभीरने केलं.

विराटचं प्रत्युत्तर 

गौतम गंभीरने केलेल्या त्या टीकेवर विराट कोहलीनेही प्रत्युत्तर दिलं होतं. बाहेर बसलेली लोकं काय म्हणत आहेत याचा विचार करत बसलो असतो, तर मला घरीच बसावं लागलं असतं, असं उत्तर विराटने दिलं. 'निश्चितच तुम्ही आयपीएल जिंकायचा प्रयत्न करता. माझ्याकडून ज्याची अपेक्षा आहे तेच मी करतो. आयपीएल जिंकल्याबद्दल किंवा न जिंकल्याबद्दल होणाऱ्या टीकेची मी पर्वा करत नाही. आपलं सर्वश्रेष्ठ देण्याचा मी प्रयत्न करतो. प्रत्येक स्पर्धा जिंकण्याचा मी प्रयत्न करतो, पण प्रत्येकवेळी असं होत नाही,' अशी प्रतिक्रिया विराटने दिली.

'आम्हाला आयपीएल का जिंकता आली नाही याचा आम्हाला व्यावहारिक विचार करायला हवा. दबावात असताना खराब निर्णय घेतल्यामुळे असं झालं. जर मी बाहेर बसलेल्यांसारखा विचार करायला लागलो, तर मी पाच मॅचही खेळू शकलो नसतो आणि घरी बसलो असतो,' असं टोला विराटने गंभीरला हाणला.

धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने आणि रोहितच्या नेतृत्वात मुंबईने आत्तापर्यंत तीन-तीन वेळा आयपीएल जिंकलं आहे. तर विराटच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरूला एकदाही आयपीएल जिंकता आलं नाही. गौतम गंभीरने त्याच्या नेतृत्वात कोलकाताला २०१२ आणि २०१४ साली आयपीएलमध्ये विजय मिळवून दिला होता.