मुंबई: बीसीसीआयने आगामी विंडीज व ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी-२० मालिकेसाठी भारतीय संघातून महेंद्रसिंह धोनीला वगळल्याची सध्या भारतीय क्रिकेट रसिकांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. यानंतर अनेकांनी धोनी पर्वाचा अस्त झाल्याची चर्चा सुरु केली होती. मात्र, धोनीच्या कट्टर चाहत्यांना तो अजूनही भारतीय संघात पुनरागमन करु शकतो, अशी आशा आहे.
मात्र, निवड समितीच्या नव्या स्पष्टीकरणामुळे धोनी पर्वाचा खरोखरच अस्त होणार असल्याची भीती खरी ठरण्याची शक्यता आहे. 'द इंडियन एक्स्प्रेस'च्या माहितीनुसार निवड समितीने धोनीला वगळण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेतला आहे.
२०२० साली ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्यादृष्टीने निवड समितीने ही पावले उचलली आहेत. धोनी हा विश्वचषक खेळू शकेल, असे निवड समितीच्या सदस्यांना वाटत नाही. त्यामुळे भविष्यात धोनीला भारताच्या टी-२० संघात स्थान देण्यात काहीच अर्थ नाही. त्याच्याऐवजी ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक या दोन पर्यायी यष्टीरक्षकांना संधी दिली जाईल, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.
निवड समितीने संघ व्यवस्थापनामार्फत हा संदेश धोनीपर्यंत पोहोचवला आहे. मात्र, त्यानंतर धोनीकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.
दरम्यान, टी-२० संघात धोनीला जागा नसली तरी एकदिवसीय सामन्यांसाठी धोनी अजूनही उपयुक्त खेळाडू असल्याचे निवड समितीचे मत आहे. सध्या त्याच्याकडून फारशा धावा होत नसल्या तरी निर्णायक सामन्यांमध्ये त्याच्या अनुभवाचा फायदा संघाला मिळू शकतो, असे निवड समितीचे मत आहे. त्यामुळे एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळायचे किंवा नाही, याचा निर्णय निवड समितीने धोनीवरच सोपवला आहे.