सेंट जॉर्ज : वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये झालेल्या चौथ्या वनडेमध्ये रेकॉर्डचा पाऊस पडला आहे. वेस्ट इंडिजचा विस्फोटक बॅट्समन क्रिस गेलनं या मॅचमध्ये ९७ बॉलमध्ये १६२ रनची खेळी केली. गेलच्या या खेळीमध्ये १४ सिक्स आणि ११ फोरचा समावेश होता. क्रिस गेलच्या या खेळीनंतरही वेस्ट इंडिजचा या मॅचमध्ये २९ रननी पराभव झाला. या खेळीबरोबरच क्रिस गेलनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० सिक्सचा विक्रम केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड क्रिस गेलनं या सीरिजच्या सुरुवातीलाच केला होता. पहिल्या वनडेमध्येच गेलनं शाहिद आफ्रिदीचं ४७६ सिक्सचं रेकॉर्ड मोडलं होतं.
या मॅचमध्ये इंग्लंडनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. ५० ओव्हरमध्ये इंग्लंडनं ४१८ रनचा डोंगर उभा केला. जॉस बटलरनं ७७ बॉलमध्ये १५० रन केले. बटलरच्या खेळीमध्ये १२ फोर आणि १२ सिक्सचा समावेश होता. तर इयॉन मॉर्गननं ८८ बॉलमध्ये १०३ रन केले. एलेक्स हेल्सनं ७३ बॉलमध्ये ८२ रन आणि जॉनी बेअरस्टोनं ४३ बॉलमध्ये ५६ रनची खेळी केली.
इंग्लंडनं ठेवलेल्या ४१९ रनचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची टीम ४८ ओव्हरमध्ये ३८९ रनवर ऑल आऊट झाली. त्यामुळे क्रिस गेलची ही खेळी पाण्यात गेली. या सीरिजच्या ३ मॅचपैकी पहिल्या मॅचमध्ये गेलनं १३५ रनची खेळी केली. दुसऱ्या वनडेमध्ये ५० रन केले. तिसरी मॅच पावसामुळे रद्द झाली, तर चौथ्या मॅचमध्ये गेलनं १६२ रन ठोकले. ५ वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये इंग्लंड आता २-१नं पुढे आहे.
चौथ्या वनडेतल्या या खेळीबरोबरच गेलनं वनडेमध्ये १० हजार रन पूर्ण केले. वनडे क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजकडून १० हजार रन करणारा गेल हा दुसरा क्रिकेटपटू आहे. गेलच्या आधी ब्रायन लारानं २९५ वनडेमध्ये १०,३४८ रन केले आहेत. गेलनं २८८ वनडेमध्ये १०,०७४ रन केले आहेत. यामध्ये २५ शतकं आणि ५० अर्धशतकांचा समावेश आहे. गेलनं वनडेमध्ये एक द्विशतकही झळकावलं आहे. वनडे क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत १४ जणांना १० हजार रनचा टप्पा ओलांडता आला आहे.
रेकॉर्डचा पाऊस
वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्धच्या या मॅचमध्ये आणखी रेकॉर्ड पाहायला मिळाले. या संपूर्ण मॅचमध्ये दोन्ही टीमनी एकूण ४६ सिक्स मारले. एका वनडे मॅचमध्ये हे सर्वाधिक सिक्स आहेत. तर एका इनिंगमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचं रेकॉर्डही इंग्लंडनं या मॅचमध्ये केलं. इंग्लंडच्या इनिंगमध्ये एकूण २४ सिक्सचा समावेश होता. या मॅचमधल्या एकूण ५३२ रन फोर आणि सिक्समधून आल्या. फोर-सिक्समधून एवढ्या रन येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याचबरोबर या मॅचमध्ये एकूण ८०७ रन झाल्या. एका मॅचमधल्या या तिसऱ्या सर्वाधिक रन आहेत.