विराट कोहलीचं प्रत्येक विधान सापडतंय वादाच्या भोवऱ्यात!

भारतीय क्रिकेट संघात सध्या वाद सुरू आहेत.

Updated: Dec 17, 2021, 07:40 AM IST
विराट कोहलीचं प्रत्येक विधान सापडतंय वादाच्या भोवऱ्यात! title=

मुंबई : भारतीय क्रिकेट संघात सध्या वाद सुरू आहेत. जेव्हापासून विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आलं आहे, तेव्हापासून सातत्याने वादग्रस्त बातम्या समोर येत आहेत. त्याचबरोबर अनेक दिग्गजांनीही विराटबद्दल वक्तव्यं करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, आता एका दिग्गजाने विराटच्या भाषेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

हा दिग्गज खेळाडू विराटवर भडकला

भारताचे माजी क्रिकेटपटू प्रज्ञान ओझा याने कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की, एकदिवसीय कर्णधारपदावरून काढून टाकणे आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्धता याविषयीच्या प्रश्नांना उत्तर देताना कोहली आपले शब्द योग्यरित्या वापरायला हवे होते.

ओझाने ट्विटरवर लिहिलं की, "एखादी व्यक्ती फक्त त्याची ताकद दाखवते आणि त्याला लोकांसमोर काय दाखवायचं आणि काय दाखवायचे नाही हे माहीत असते. तो अप्रत्यक्षपणे म्हणाला की कोहलीने असं काही बोलायला नको होतं ज्यामुळे वाद वाढेल."

रोहित शर्माने वनडे कर्णधारपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच मीडियाला संबोधित करताना, कोहलीने घडलेल्या घटना सांगितल्या आणि त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरून काढून टाकल्याबद्दल कसं कळलं हे सांगितलं. यासोबतच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या म्हणण्यावर भाष्य केलं.

गांगुली यांनी सांगितलं होतं की, मी कोहलीला टी-२० कर्णधारपद सोडू नये अशी विनंती केली होती. मात्र कोहलीने या दाव्यांचं खंडन करत म्हटलं की, जेव्हा मी टी-20 कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या निर्णयाबद्दल बीसीसीआयला सांगितले, तेव्हा त्यांनी हे योग्य दिशेने एक चांगलं पाऊल म्हटलं. मला त्यावर पुनर्विचार करण्यास सांगितले नाही.