मुंबईचा 'हा' माजी गोलंदाज झाला अमेरिकन संघाचा कर्णधार

सौरभ आपल्या या कामगिरीवर समाधानी नव्हता.

Updated: Nov 4, 2018, 02:36 PM IST
 मुंबईचा 'हा' माजी गोलंदाज झाला अमेरिकन संघाचा कर्णधार title=

मुंबई: मुंबईचा माजी गोलंदाज सौरभ नेत्रावलकर हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. काही वर्षांपूर्वी मुंबईच्या संघाकडून खेळणाऱ्या सौरभची U-19 क्रिकेट कारकीर्दही जोमात होती. २०१० साली झालेल्या U-19 विश्वचषकात तो भारताकडून सर्वाधिक बळी टिपणारा गोलंदाज ठरला होता. या संपूर्ण मालिकेत तो जो रुट आणि अहमद शहझाद यांना अक्षरश: सळो की पळो करुन सोडले होते. यानंतर रणजी करंडकातील एकमेव सामान्यातही त्याने आपल्या गोलंदाजीची छाप पाडली होती. 
 
 मात्र, सौरभ आपल्या या कामगिरीवर समाधानी नव्हता. क्रिकेटमध्ये आपल्याला भविष्य आहे का, याबद्दल त्याच्या मनात साशंकता होती. अखेर त्याने करिअरला प्राधान्य देत २०१५ मध्ये कम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. 

अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठात दाखल झाल्यानंतरही सौरभची क्रिकेटची आवड कायम राहिली. यानंतर आपले शिक्षण पूर्ण करून ओरॅकल कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणूनही रुजू झाला. मात्र, क्रिकेटविषयीचे प्रेम त्याला स्वस्थ बसून देत नव्हते.

त्यामुळेच शुक्रवारी ऑफिसमधून सुटल्यावर सौरभ क्रिकेटच्या स्थानिक स्पर्धांमध्ये कखेळायला सॅनफ्रान्सिन्स्कोहून सहा तासांचा प्रवास करुन लॉस एंजालिसला जायचा. शनिवारचा दिवस याठिकाणी खेळल्यानंतर तो रात्रीपर्यंत सॅनफ्रान्सिकोला परतायचा आणि दुसऱ्या दिवशी येथेही तो ५० षटकांचा सामना खेळायचा. 

सौरभची ही मेहनत बघून त्याची अमेरिकेच्या राष्ट्रीय संघासाठी निवड करण्यात आली. यानंतर सौरभने कधीच मागे वळून पाहिले नाही. अखेर त्याने आपल्या कामगिरीच्या जोरावर अमेरिकन संघाचे कर्णधारपद मिळवले. 

अमेरिकत संघात वेस्ट इंडिज, भारत आणि पाकिस्तान अशा देशांतून आलेल्या खेळाडुंचा भरणा आहे. यापूर्वी महाराष्ट्राच्या सुशील नाडकर्णी आणि हैदराबादच्या इब्राहिम खलील यांनीदेखील अमेरिकन संघाचे नेतृत्त्व केले होते.