FIFA World Cup Trophy: कतारमध्ये खेळल्या जाणाऱ्या फिफा वर्ल्डकपमध्ये (FIFA World Cup 2022) आज फ्रान्स विरूद्ध अर्जेंटीना (Argentina Vs France) असा सामना रंगणार आहे. हा फायनलचा सामना भारतीय वेळेनुसार, रात्री 8.30 वाजता होणार आहे. Lusail Stadium मध्ये हा सामना खेळवला जाणार असून दोन्ही टीम तिसऱ्यांदा विश्वविजेता बनण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे. यावेळी चाहत्यांचं लक्ष हे अधिकतर अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीकडे (Lionel Messi) असणार आहे.
फायनल सामन्यानंतर विजेत्या टीमला देण्यात येणार्या ट्रॉफीची कहाणी देखील खूप रंजक आहे. आजच्या अंतिम सामन्यातील विजेत्या टीमला खरी ट्रॉफी फक्त सेलिब्रेशनसाठी दिली जाईल. या सेलिब्रेशननंतर फिफाचे अधिकारी विजेत्या टीमकडून खरी ट्रॉफी पुन्हा घेता. याचा अर्थ फ्रान्स तसंच अर्जेंटिना टीमला ही ट्रॉफी घरी नेण्याची संधी मिळणार नाहीये. विजेत्या टीमला डुप्लिकेट ट्रॉफी दिली जाणार आहे. ही डुप्लिकेट ट्रॉफी ब्राँझची असून त्यावर सोन्याचा थर लावण्यात आलेला असतो.
फिफा वर्ल्डकपची खरी ट्रॉफी ही झुरीच इथल्या फिफाच्या मुख्य कार्यालयात राहते. ही ट्रॉफी वर्ल्ड कप टूर आणि वर्ल्ड कप मॅचदरम्यान सर्वांसमोर आणली जाते. 2005 साली फिफाने एक नियम केला होता. या नियमानुसार, विजेती टीम खरी ट्रॉफी घरी नेणार नाही.
1930 मध्ये पहिल्यांदा फुटबॉल वर्ल्ड कपला सुरुवात झाली होती. त्यावेळी विजेत्या टीमला देण्यात येणाऱ्या ट्रॉफीचं नाव ज्युल्स रिमेट ट्रॉफी होतं. ज्युल्स रिमेट ट्रॉफी 1970 पर्यंत चॅम्पियन टीम्सना देण्यात आली. यानंतर वर्ल्डकप ट्रॉफीला नव्या पद्धतीने तयार करण्यात आलं.
विश्वचषक विजेतेपदासाठी फ्रान्स आणि अर्जेंटिना या दोघांनीही अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. फ्रान्स सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्यामागून एक पाऊल दूर आहे, तर अर्जेंटिनाच्या संघाला जगज्जेता होण्याची संधी आहे. दोन्ही संघांमधील सामना चुरशीचा होणार आहे. फ्रान्सचा संघ आणि अर्जेंटिनाचा दोन्ही संघाचा खेळही आक्रमक आहे, त्यामुळे सामन्याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.