कोलकाता : कोलकात्यामध्ये आयसीसीची बैठक सुरु आहे. या बैठकीदरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट व्हावं, असा आग्रह पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी धरला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या करारामध्ये बीसीसीआय खोडा घालत असल्याचा आरोपही सेठी यांनी केला आहे. तसंच युएईसोडून इतर कोणत्याही ठिकाणी क्रिकेट खेळायला पाकिस्तान तयार असल्याचं सेठी म्हणाले. बीसीसीआयनं मात्र या प्रकरणावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला खडसावलं आहे. भारताविरुद्ध क्रिकेट खेळण्याचा विचार करण्याआधी पाकिस्तानच्या खेळाडूंना भारताचा आदर करायला शिकवा, असं परखड मत बीसीसीआयनं व्यक्त केलं आहे. पाकिस्तानचा क्रिकेटपटू हसन अलीनं वाघा बॉर्डरवर भारतीय जवानांकडे बघून माकडचाळे केले. यानंतर बीसीसीआयनं ही प्रतिक्रिया दिली आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं क्रिकेटनेक्स्ट या वेबसाईटशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे.
काहीच दिवसांपूर्वी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं काश्मीर प्रश्नात आपलं नाक खुपसलं होतं. भारत व्याप्त काश्मीरमध्ये निष्पाप नागरिकांची हत्या करण्यात येत आहे. स्वातंत्र्य मागणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्था आता कुठे आहेत? या संस्था रक्तपात थांबवण्यासाठी कोणताच प्रयत्न का करत नाहीत, असं ट्विट शाहिद आफ्रिदीनं केलं होतं.
पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायचा का नाही हे बीसीसीआयच्या हातात नाही. ज्याप्रमाणे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड देशाची योजना ठरवत नाही. त्याचप्रमाणे तुमच्यासोबत क्रिकेट खेळायचं का नाही हा निर्णय बीसीसीआयचा नसून भारत सरकारचा आहे. भारतातल्या कायद्याप्रमाणे आणि सरकारच्या रणनितीप्रमाणे आम्हाला वागावं लागेल. कायद्यानं न वागायला पाकिस्तानला पर्याय असू शकेल पण आम्हाला तो पर्याय नाही, असा चिमटा बीसीसीआयचा अधिकाऱ्यानं काढला आहे.
सप्टेंबरमध्ये युएईमध्ये होणाऱ्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने-सामने असतील. याआधी ही स्पर्धा भारतात होणार होती पण पाकिस्तानच्या विरोधानंतर ही स्पर्धा युएईला हलवण्यात आली.