IPL Retention: आयपीएलमध्ये हे खेळाडू फिक्स; नावं फायनल

सध्याच्या 8 फ्रँचायझींसाठी खेळाडूंना कायम म्हणजेच रिटेन ठेवण्याची मुदत आज (मंगळवार) संपत आहे.

Updated: Nov 30, 2021, 12:06 PM IST
IPL Retention: आयपीएलमध्ये हे खेळाडू फिक्स; नावं फायनल

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही जगातील लोकप्रिय T20 लीग आता 15 व्या हंगामाकडे वाटचाल करतेय. सध्याच्या 8 फ्रँचायझींसाठी खेळाडूंना कायम म्हणजेच रिटेन ठेवण्याची मुदत आज (मंगळवार) संपत आहे.

जुन्या आठ संघातील रिटेन केलेल्या खेळाडूंना अंतिम रूप दिल्यानंतर, लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन फ्रँचायझींना 1 ते 25 डिसेंबर दरम्यान 3 खेळाडू निवडण्याची संधी मिळेल, त्यानंतर जानेवारीमध्ये लिलाव होणार आहे.

8 टीम जास्तीत जास्त 4 खेळाडू ठेवू शकतात, ज्यामध्ये 3 पेक्षा जास्त भारतीय आणि 2 पेक्षा जास्त परदेशी खेळाडू असू शकत नाहीत. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, आठ जुन्या टीम्सने त्यांची रिटेंशन लिस्ट जवळजवळ फायनल केली आहे.

आतापर्यंत रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूंची यादी-

दिल्ली कॅपिटल्स (पंत, नॉर्किया, पृथ्वी आणि अक्षर) 

दिल्ली कॅपिटल्सने कर्णधार ऋषभ पंतला रिटेन केलं आहे. त्याच्याशिवाय पृथ्वी शॉ, अक्षर पटेल आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नोर्किया यांना देखील रिटेन करण्यात आलं आहे. खांद्याच्या दुखापतीनंतर पुनरागमन करताना दिल्लीचं कर्णधारपद न मिळाल्याने स्टार खेळाडू श्रेयस अय्यर टीम सोडणार आहे.

मुंबई इंडियन्स (रोहित, बुमराह) 

5 वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स फ्रँचायझी कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना रिटेन करून टीमला नवं रूप देता येईल.  सूर्यकुमार यादव आणि अनुभवी किरॉन पोलार्ड यांनाही रिटेन करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र अहवालानुसार, अद्याप दोघांनाही रिटेन केल्याचा निर्णय झालेला नाही.

चेन्नई सुपर किंग्स (धोनी, जडेजा, मोईन, ऋतुराज)

चेन्नई सुपर किंग्जमध्ये कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांना कायम ठेवण्यात आलं आहे. तर गेल्या मोसमात संघाच्या मोलाची भूमिका बजावणाऱ्या ऋतुराज गायकवाडला संघात कायम ठेवण्यात आलं आहे. परदेशी खेळाडूंमध्ये मोईन अलीला रिटेन करण्यात आलं आहे. मोईन अली सध्याच्या T10 लीगमध्ये धमाकेदार फॉर्ममध्ये आहे.

कोलकाता नाइट राइडर्स (रसेल, नरेन, वरुण आणि वेंकटेश) 

केकेआर फ्रँचायझीने वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर आणि सुनील नरेन यांना त्यांच्यासोबत कायम ठेवलं आहे. म्हणजेच इंग्लंडचा वर्ल्डकप विजेता कर्णधार इऑन मॉर्गन आणि शुभमन गिल यांना लिलावात उतरावं लागणार आहे.

राजस्थान रॉयल्स (संजू सॅमसन)

राजस्थानने कर्णधार संजू सॅमसनला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सॅमसनला कर्णधार बनवूनही संघाचे नशीब बदललं नाही. यशस्वी जैस्वालही कायम ठेवण्याच्या शर्यतीत सामील आहे. त्याचप्रमाणे इंग्लंडचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरला कायम ठेवण्याची शक्यता आहे. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (कोहली, मॅक्सवेल) 

विराट कोहलीने कर्णधारपद सोडलं असलं तरी आरसीबीने या खेळाडूला रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच फ्रँचायझीने ग्लेन मॅक्सवेलचं नावही फायनल केलं आहे.

सनराइजर्स हैदराबाद (केन विल्यमसन) 

सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीने किवी कर्णधार केन विल्यमसनला रिटेन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर राशिद खानच्या नावावरही संघ विचार करतोय. त्यामुळे भुवनेश्वर कुमार आणि टी. नटराजन या वेगवान गोलंदाजांना कायम ठेवणार का हे पाहणे बाकी आहे.

पंजाब किंग्ज

अहवालानुसार, पंजाब किंग्जने एकाही खेळाडूला रिटेन केलेलं नाही. पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुलचा ऑक्शनमध्ये प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. आता या फ्रँचायझीसमोर नवीन सुरुवात करण्याचं आव्हान आहे.