पॅट कमिन्सला 20 कोटीत खरेदी केल्यानंतर इरफान पठाणने एका वाक्यात दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. हैदराबादने तब्बल 20.50 कोटींमध्ये पॅट कमिन्सला विकत घेतलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 19, 2023, 04:47 PM IST
पॅट कमिन्सला 20 कोटीत खरेदी केल्यानंतर इरफान पठाणने एका वाक्यात दिली प्रतिक्रिया, म्हणाला... title=

IPL Auction: आयपीएलचा लिलाव सुरु असून यावेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सवर सर्वाधिक बोली लागली आहे. ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय वर्ल्डकप जिंकवून देणारा कर्णधार पॅट कमिन्सला  सनराईझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) विकत घेतली आहे.  हैदराबादने तब्बल 20 कोटी 50 लाखात पॅट कमिन्सला संघात सामावून घेतलं आहे. यासह पॅट कमिन्सने आयपीएलच्या इतिहासातील सर्व रेकॉर्ड्स मोडले आहेत. 

विशेष म्हणजे पॅट कमिन्सची बेस प्राईज 2 कोटी होती. पॅट कमिन्सला लिलावात खरेदी करण्यासाठी हैदराबाद, चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात चढाओढ सुरु होता. शेवटी बंगळुरु आणि हैदराबाद आमने-सामने आले होते. दोन्ही संघांमध्ये बोली लावताना चांगलीच चुरस रंगली होती. अखेर हैदराबादने बाजी मारली आणि 20 कोटी 50 लाख रूपयांत पॅट कमिन्सला खरेदी केलं. 

दरम्यान पॅट कमिन्ससाठी तब्बल 20 कोटी रुपये मोजल्याने सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा पूर आला आहे. अनेकांनी पॅट कमिन्ससाठी इतकी पैसे मोजण्याची गरज नव्हती असं मत मांडलं आहे. ही खरेदी व्यर्थ नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याशिवाय हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारनलाही ट्रोल केलं जात आहे. पॅट कमिन्सची खरेदी करताना अजिबात डोकं वापरलं नसल्याची टीका तिच्यावर होत आहे. 

टीका करणाऱ्यांमध्ये भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणचाही समावेश आहे. इरफान पठाणने एक्सवर पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे. इरफान पठाणने ही उपयुक्त खरेदी नसल्याचं थेट म्हटलं आहे. "आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक महागडी खरेदी. पण ही उपयुक्त खरेदी आहे का? नाही," असं इरफान खानने पोस्टमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान हैदराबाद संघ लिलावात वर्ल्डकप विजेत्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये जास्त रस दाखवत असल्याचं दिसलं. याचं कारण ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकवणाऱ्या ट्रॅव्हिस हेड यालाही ताफ्यात सामील करून घेतलं आहे. ट्रॅव्हिस हेड याची बेस प्राईज 2 कोटी होती. चेन्नई आणि हैदराबाद यांच्यातील लढतीनंतर हैदराबाद संघाने त्याला 6 कोटी 80 लाख रूपयांना खरेदी केलं आहे.