बडोदा : एकीकडे टीम इंडिया अनेक दशकांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकल्याचा आनंद साजरा करताना दिसतेय. मात्र, दुसरीकडे भारताचे माजी क्रिकेटपटू जेकब मार्टीन यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय. भीषण अपघातानंतर जेकब मार्टीन यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ४६ वर्षीय जेकब मार्टीन सध्या आयसीयूमध्ये उपचार घेत असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
काही दिवसांपूर्वी जेकब मार्टिन आपल्या कुटुंबीयांसाठी आईसस्क्रीम आणयाला गेले असताना घरी परतताना, रस्त्यातील गतिरोधक चुकवताना त्यांच्या दुचाकीचं टायर घसरून त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या फुप्फुसाला मार लागला असून पाय फ्रॅक्चर झाल्याची महिती भारताचे माजी क्रिकेटपटू किरण मोरे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना दिलीय. 'टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलेल्या माहितीनुसार, जेकब मार्टीन यांची प्रकृती अद्याप गंभीर आहे. आपण त्यांना भेटायला गेलो असता त्यांनी आपल्याला ओळखलं, असं किरण मोरे यांनी म्हटलंय.
जेकब मार्टीन यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्यासाठी शक्य ती मदत करण्याचे आश्वासन बीसीएनं (बडोदा क्रिकेट असोसिएशन) दिलंय. तसंच यासाठी आम्ही बीसीसीआयशीही संपर्क करणार असल्याची माहिती बीसीएच्या सचिव स्नेहल पारिख यांनी दिली. ९ जानेवारी रोजी भारताचा तडाखेदार फलंदाज युसुफ पठाण यानंदेखील जेकब मार्टीन यांची भेट घेतली होती. याबद्दल त्याने ट्विट करत माहिती दिली. मार्टीन यांची तब्येत लवकर चांगली व्हावी, यासाठी त्याने प्रार्थना केली.
Former India cricketer and ex-Baroda coach Jacob Martin met with an accident and is in the hospital.
Wish you a speedy recovery Jacob bhai and praying for your wellbeing. #getwellsoon pic.twitter.com/FDUNI74i3C— Yusuf Pathan (@iamyusufpathan) January 9, 2019
जेकब मार्टीन यांनी प्रथम श्रेणीतील १३८ सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी ४६.६५ च्या सरासरीने ९१९२ धावा केल्या. यात २३ शतके तर ४७ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यांनी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९९९ साली टोरंटो इथे वेस्ट इंडीज विरुद्ध पदापर्ण केले. १९९९-२००१ या दरम्यान त्यांनी एकूण १० एकदिवसीय सामने खेळले आहेत. जेकब मार्टीन यांनी बडोदा संघाचं प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिलं. तसेच त्यांनी संघाचे नेतृत्वदेखील केले आहे.