पांड्या आणि राहुलच्या वक्तव्यांवर विराट कोहली म्हणाला...

एका टेलिव्हिजन वाहिनीवरील कार्यक्रमात क्रिकेटपटू के. एल. राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी केलेली आक्षेपार्ह वक्तव्ये त्यांना चांगलीच भोवण्याची शक्यता आहे.

Updated: Jan 11, 2019, 09:26 AM IST
पांड्या आणि राहुलच्या वक्तव्यांवर विराट कोहली म्हणाला...

नवी दिल्ली - एका टेलिव्हिजन वाहिनीवरील कार्यक्रमात क्रिकेटपटू के. एल. राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी केलेली आक्षेपार्ह वक्तव्ये त्यांना चांगलीच भोवण्याची शक्यता आहे. आता या विधानांवर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि सध्याचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली यानेही प्रतिक्रिया दिली आहे. भारताचा क्रिकेट संघ आणि जबाबदार क्रिकेटपटू म्हणून आम्ही या दोन्ही क्रिकेटपटूंनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन करत नाही. त्यांनी व्यक्त केलेली मते ही त्यांची वैयक्तिक होती. संघाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. या प्रकरणी बीसीसीआय काय निर्णय घेते, याची आम्ही वाट पाहतो आहोत. दरम्यान, के. एल. राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी केलेल्या वक्तव्याचा संघाच्या मनोबलावर काहीही परिणाम झालेला नाही, असेही त्याने स्पष्ट केले.

एका खासगी टेलिव्हिजन वाहिनीवरील कार्यक्रमात के. एल. राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. त्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागली. बीसीसीआयने या दोन्ही क्रिकेटपटूंवर दोन सामन्यांसाठी बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी हा प्रस्ताव ठेवला. करण जोहर याच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये के. एल. राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. 

के. एल. राहुल आणि हार्दिक पांड्या यांच्या वक्तव्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये आमच्यातील परस्परांच्या विश्वासात काहीही बदल झालेला नाही. त्याचबरोबर आमचे मनोबलही कमी झालेले नाही. त्यांची वक्तव्ये पूर्णपणे वैयक्तिक होती. त्यांच्यावर काय कारवाई करायची हे संबंधित समिती ठरवेल, असे विराट कोहलीने म्हटले आहे. 

दरम्यान, या वादावरून हार्दिक पांड्याने दिलगिरी व्यक्त केली असली, तरी के एल राहुलने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बीसीसीआयने या दोघांना उत्तर देण्यासाठी २४ तासांचा वेळ दिला होता. भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या वनडे सीरिजला १२ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पांड्या आणि राहुल हे दोघेही भारतीय संघात आहेत.