Ajinkya Rahane on Gaba Test : कॉमेंट्रेटर विवेक राजदान यांच्या तोंडी तीन वर्षांपूर्वी निघालेले सहा शब्द भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अजरामर राहिले. त्याला कारण देखील खास होतं, कॅप्टन अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच टीम इंडियाने गाबाचं मैदान मारलं होतं. त्याचबरोबर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर 2-1 ने बाजी मारत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गावस्कर यांच्या देशात आणली. आज या सामन्याला तब्बल 3 वर्ष पूर्ण झाली आहे. दरम्यान या सिरीजच्या आठवणी भारतीय चाहत्यांच्या मनात पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. एका डॉक्युमेंट्रींमध्ये याविषयी बोलताना तत्कालीन कर्णधार अजिंक्य रहाणेला अश्रू (Ajinkya rahane crying) अनावर झाले होते.
2020-2021 च्या नोव्हेंबरमध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली होती. यावेळी 4 टेस्ट सामने खेळण्यात आले होते. पहिल्या टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाची दाणादण उडवत दुसऱ्या डावात अवघ्या 36 रन्समध्ये टीम इंडियाला ऑलआऊट करत सामना जिंकला. इतक्या दारूण पराभवानंतर आणि कर्णधार विराट कोहली मायदेशी परतल्यानंतर कर्णधारपदाची जबाबदारी अजिंक्य रहाणेने स्विकारली.
काही दिवसांपूर्वी या टेस्ट सिरीजवर एक डॉक्युमेंट्री रिलीज करण्यात आली होती. 'बंदो मे था दम' असं या डॉक्युमेंट्रीचं नाव असून ऑस्ट्रेलियाविरूद्धची ही सिरीज जिंकवण्यात ज्या खेळाडूंचा मोलाचा वाटा होता, त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये कोहलीनंतर उर्वरीत 3 सामन्यांच्या कर्धणारपदाची धुरा सांभाळणाऱ्या अजिंक्य रहाणेचाही समावेश आहे.
या डॉक्युमेंट्रीमध्ये बोलताना अजिंक्य रहाणे म्हणाला, अॅडलेड टेस्टमध्ये 36 वर टीम इंडिया ऑलआऊट झाली होती तेव्हा लोकं आमच्याविषयी वाईट बोलत होते, अगदी आमच्याविरोधात गेले होते. त्या सगळ्या गोष्टी शेवटचा सामना जिंकल्यानंतर माझ्या डोक्यात आल्या. तेव्हा आम्ही कुठे होते आणि आता कुठे आहोत याचाच विचार मी करत होतो.
टीम इंडियाच्या पराक्रमाची ही सर्व कहाणी सांगताना अजिंक्य रहाणेचे डोळे पाणावले होते. या सिरीजमध्ये 2 सामन्यांत विजय मिळवून भारताने इतिहास रचला होता. अजूनही ही सिरीज क्रिकेट प्रेमींना रोमाचिंत करते.
दरम्यान, टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या अजिंक्य रहाणेला सध्या टेस्ट टीममध्ये देखील संधी दिली जात नाही. त्याचबरोबर या सामन्यात मैदानात पाय रोवून खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराला देखील टीम इंडियामध्ये संधी दिली गेली नाही. त्यामुळे आता सिलेक्टर्सवर टीका होत आहे.