close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

गांगुली बीसीसीआयचा नवा अध्यक्ष; विराट-शास्त्रींचं समीकरण बदलणार?

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीची निवड निश्चित झाली आहे.

Updated: Oct 14, 2019, 04:40 PM IST
गांगुली बीसीसीआयचा नवा अध्यक्ष; विराट-शास्त्रींचं समीकरण बदलणार?

मुंबई : बीसीसीआयच्या अध्यक्षपदी भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीची निवड निश्चित झाली आहे. २३ ऑक्टोबरला याची अधिकृत घोषणा होणार आहे. पण सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर कोच रवी शास्त्री आणि कॅप्टन विराट कोहली यांच्यासाठीची समीकरण बदलू शकतात. कारण गांगुली आणि रवी शास्त्री यांच्यातील संबंध चांगले नाहीत. गांगुली क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य असताना अनिल कुंबळे यांना कोचपदावरून हटवल्यानंतर गांगुली-शास्त्रींमधील वाद अधिक तीव्र झाला होता.

काय आहे गांगुली-शास्त्रीचा वाद?

२०१६ साली टीम इंडियाचा प्रशिक्षक होता न आल्यामुळे रवी शास्त्रीने गांगुलीवर आरोप केले होते. गांगुलीमुळेच माझी प्रशिक्षकपदी निवड झाली नसल्याचं शास्त्री म्हणाला होता. यानंतर शास्त्री मुर्खांच्या नंदनवनात राहतो, असं प्रत्युत्तर गांगुलीने दिलं होतं. सचिन, गांगुली आणि लक्ष्मण यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने २०१६ साली अनिल कुंबळेंची प्रशिक्षकपदी निवड केली होती. 

२०१७ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलच्या पराभवानंतर विराट आणि कुंबळेमध्ये वाद झाले. त्यामुळे कुंबळेंनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. यानंतर सचिन, गांगुली आणि लक्ष्मण यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने शास्त्रींना प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं होतं. २०१९ वर्ल्ड कपनंतर २०२० साली होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपपर्यंत रवी शास्त्रींना प्रशिक्षक म्हणून मुदतवाढ देण्यात आली. 

गौरव कपूरच्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स या शोमध्ये केलेल्या एका वक्तव्यावरूनही गांगुलीने रवी शास्त्रींवर निशाणा साधला होता. २००७ सालच्या बांगलादेश दौऱ्यावर गांगुली बसमध्ये वेळेवर आला नाही, त्यामुळे मी बस सोडून दिली होती, असं शास्त्री म्हणाले होते. रवी शास्त्रींचा हा दावा गांगुलीने फेटाळून लावला होता.

रवी शास्त्रीची सकाळी मुलाखत घेऊ नकोस. त्याला सकाळी काहीच आठवत नाही. त्याची मुलाखत सकाळी नको, संध्याकाळी कर, असा सल्ला गांगुलीने गौरव कपूरला दिला होता. तसंच भविष्यात शास्त्रीला भेटेन तेव्हा या किश्शाबद्दल विचारेन, कारण असा कोणताच प्रकार घडला नव्हता, असं गांगुली म्हणाला होता.