नवी दिल्ली : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू गौतम गंभीरनं मागच्या आठवड्याच्या सुरुवातीला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त व्हायची घोषणा केली होती. गंभीरनं रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळताना आंध्र प्रदेशविरुद्ध शेवटची मॅच खेळली. या मॅचबरोबरच गौतम गंभीरची १५ वर्षांची क्रिकेट कारकिर्द संपुष्टात आली. शेवटच्या मॅचमध्ये शानदार शतक करत गंभीरनं क्रिकेटला अलविदा केलं. गंभीरनं प्रथम श्रेणी क्रिकेट आणि टी-२०मध्ये मिळून ३१,३६२ रन केले.
गौतम गंभीरनं भारतामध्ये २२,४८४ रन केले. याबाबतीत गंभीरनं राहुल द्रविडला(२१,२३७ रन) मागे टाकलं. पण गंभीर सचिन तेंडुलकरच्या(२४,४५२ रन) मागे राहिला. गौतम गंभीरनं भारतीय टीममध्ये महत्त्वाचं योगदान दिलं. गौतम गंभीर भारताच्या २ वर्ल्ड कप विजयाच्या टीमचा हिस्सा होता.
२००७ सालचा टी-२० वर्ल्ड कप आणि २०११ सालच्या वर्ल्ड कपमध्ये गंभीर भारतीय टीममध्ये होता. या दोन्ही वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये गौतम गंभीर भारताचा सर्वाधिक स्कोअर करणारा खेळाडू होता. गंभीरच्या नेतृत्वात शाहरुख खानच्या केकेआरनं दोनवेळा आयपीएलमध्ये नाव कोरलं.
आंध्र प्रदेशविरुद्धच्या मॅचमध्ये गंभीरनं ११२ रनची खेळी केली. गौतम गंभीरचं प्रथम श्रेणी क्रिकेटमधलं हे ४३वं शतक होतं. १८५ बॉलच्या या खेळीमध्ये गंभीरनं १० फोर मारले. मॅचच्या तिसऱ्या दिवशी आऊट होऊन गंभीर गेला तेव्हा दिल्लीच्या टीमनं त्याला 'गार्ड ऑफ ऑनर' दिला.
गंभीरच्या या खेळीनंतरही ही मॅच ड्रॉ झाली. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानात झालेल्या या मॅचमध्ये आंध्र प्रदेशनं पहिल्या इनिंगमध्ये ३९० रन केले. यानंतर बॅटिंगला आलेल्या दिल्लीनं ४३३ रनचा मोठा स्कोअर केला. यामुळे दिल्लीला पहिल्या इनिंगमध्ये २३ रनची आघाडी मिळाली. आंध्र प्रदेशची टीम दुसऱ्या इनिंगमध्ये १३० रनवर ऑल आऊट झाली. त्यामुळे दिल्लीला विजयासाठी ८८ रनचं लक्ष्य मिळालं.
८८ रनचा पाठलाग करताना दिल्लीनं ५ ओव्हरमध्ये ४१/२ एवढा स्कोअर केला. विजयासाठी ४७ रनची आवश्यकता असताना खराब उजेडामुळे मॅच थांबवण्यात आली. यानंतर पुन्हा खेळ सुरु झाला नाही आणि मॅच ड्रॉ घोषित करण्यात आली. पहिल्या इनिंगमध्ये आघाडी मिळाल्यामुळे दिल्लीला ३ पॉईंट मिळाले तर आंध्र प्रदेशला एक पॉईंट मिळाला. दिल्लीची ४ मॅचमधली ही तिसरी मॅच ड्रॉ झाली. पॉईंट्स टेबलमध्ये दिल्ली ग्रुप-बीमध्ये ७ पॉईंट्ससह आठव्या क्रमांकावर आहे.
आंध्र प्रदेशच्याही ४ मॅचपैकी ३ मॅच ड्रॉ झाल्या. ग्रुप-बीमध्ये असलेल्या आंध्र प्रदेशच्या खात्यात ५ पॉईंट आहेत. ग्रुप-बीमध्ये आंध्र प्रदेशची टीम सगळ्यात खाली नवव्या क्रमांकावर आहे.