मुंबई : गौतम गंभीर दिल्लीच्या राजकारणात सक्रिय दिसत असतानाच आता एक मोठी बातमी येत आहे. टीम इंडियामधून खेळलेला दिग्गज खेळाडू राज्यसभेत जाण्याची शक्यता आहे. हा खेळाडू खासदार म्हणून लवकरच आपल्यासमोर येऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे.
नुकत्याच 5 राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये पंजाबमध्ये काँग्रेसचा धोबीपछाड झाला. तर आपला सत्ता काबिज करण्यात यश आलं. पंजाबमध्ये भगवंत मान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता राज्य सरकारनं पंजाबमध्ये खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी सुरुवात केली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही मोठ्या खेळाडूंना राज्यसभेमध्ये पाठवण्याची शक्यता आहे. या यादीमध्ये क्रिकेटपटू हरभजन सिंगचं नाव पहिलं आहे. भगवंत मान यांनी जालंधर स्पोर्ट्स यूनिव्हर्सिटी उभारण्याचं आश्वासन दिलं होतं. यासोबत हरभजन सिंग या संस्थेची जबाबदारी पाहण्याची शक्यता आहे.
सचिन तेंडुलकर, गौतम गंभीरनंतर आता हरभजन सिंग देखील राजकारणात दिसण्याची शक्यता आहे. पंजाबचे मुख्यमंत्री विचार करतात त्यानुसार खरंच जर ही संधी हरभजनला मिळाली तर क्रीडा आणि राजकीय विश्वातही ही मोठी बातमी ठरू शकते. हरभजन सिंगला राज्यसभेत पाठवण्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब कधी होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भगवंत मान यांनी पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. कार्यकाळानुसार ते पंजाबचे 25 वे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी पंजाबच्या जनतेचे आभार मानले. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आपचे इतर नेते देखील उपस्थित होते. पंजाबच्या राज्यपालांनी भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. या सोहळ्याला आप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते. भगवंत मान यांची पत्नी आणि मुलं देखील या सोहळ्याला उपस्थित होते.