हार्दिक-राहुलला फटकारायची गरज होती- रवी शास्त्री

भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचं मोठं वक्तव्य

Updated: Mar 14, 2019, 02:45 PM IST
हार्दिक-राहुलला फटकारायची गरज होती- रवी शास्त्री title=

नवी दिल्ली : हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी कॉफी विथ करण या करण जोहरच्या शोमध्ये महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केली होती. या वक्तव्यानंतर पांड्या आणि राहुल या दोघांवर बीसीसीआयने निलंबनाची कारवाई केली होती. या दोन्ही खेळाडूंना फटकारायची गरज होती, असं वक्तव्य भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केलं आहे. तसंच जे काही झालं, त्यानंतर दोघांनाही धडा घेतला असेल जे चांगलं आहे, असंही शास्त्री म्हणाले.

'तुम्ही चूक करता आणि कधीतरी तुम्हाला शिक्षाही होते. पण जग तिकडेच संपत नाही. या अनुभवांमुळे खेळाडूंना जोरदार पुनरागमन करण्यासाठी मदतही होते,' अशी प्रतिक्रिया रवी शास्त्री यांनी दिली आहे.

हार्दिक-राहुलचं प्रकरण लोकपालकडे

बीसीसीआय हार्दिक पांड्या आणि केएल राहुलचं हे प्रकरण लोकपाल डी.के.जैन यांच्याकडे सोपवायला तयार आहे. सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीची बैठक दिल्लीमध्ये होणार आहे. या बैठकीत अधिकृतरित्या हा मुद्दा लोकपालकडे दिला जाईल. बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आयएएनएस या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली.

प्रशासकीय समितीच्या या बैठकीमध्ये पाकिस्तानच्या मुद्द्यावरही चर्चा होईल. नुकत्याच आयसीसीच्या बैठकीमध्ये बीसीसीआयने दहशतवादाला थारा देणाऱ्या देशांवर बंदी घालावी, अशा मागणीचं पत्र आयसीसीला लिहिलं होतं. आयसीसीने बीसीसीआयचा हा मुद्दा खोडून काढला होता, आणि अशाप्रकारे कारवाई करता येणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. या मुद्द्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे.

पांड्या आणि राहुल यांचं अनिश्चित काळासाठी निलंबन करण्यात आलं होतं. पण लोकपाल नियुक्त न झाल्यामुळे प्रशासकीय समितीने या दोघांवरचं निलंबन हटवलं होतं. २१ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस.ए.बोबडे आणि ए.एम.सप्रे यांच्या खंडपीठाने सेवानिवृत्त न्यायाधीश डी.के.जैन यांना बीसीसीआयचे लोकपाल म्हणून नियुक्ती केली. तत्काळ कार्यकाळ सांभाळण्यासाठी न्यायालयाने जैन यांना सांगितलं. यानंतर आता राहुल आणि हार्दिकचं प्रकरण जैन यांच्याकडे देण्यात येईल.