Hardik Pandya Practice With Red Ball : 19 सप्टेंबर पासून भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जात आहे. टीम इंडिया जानेवारी 2024 नंतर आता पुन्हा टेस्ट क्रिकेट खेळण्यासाठी उतरणार आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचा परफॉर्मन्स उत्तमच राहिलेला आहे. आयसीसीच्या टेस्ट टीम रँकिंगमध्ये टीम इंडिया मागील अनेक महिन्यांपासून दुसऱ्या क्रमांकावर आहे. बांगलादेशनंतर टीम इंडिया ऑक्टोबर महिन्यात न्यूझीलंड तर नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सिरीज खेळणार आहे. भारताच्या आगामी टेस्ट सिरीजमध्ये भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्याचं पुनरागमन होऊ शकतं असं बोललं जात आहे.
सध्या भारताचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. यात हार्दिक पंड्या रेड बॉलने बॉलिंग प्रॅक्टिस करताना दिसतोय. यावरून लोकांनी हार्दिक आता लवकरच टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार असं म्हटलं आहे. हार्दिक पंड्याने शेवटचा टेस्ट सामना हा सप्टेंबर 2018 मध्ये खेळला होता. त्यानंतर 2019 मध्ये त्याच्या पाठीच्या खालच्या भागाची सर्जरी झाली. त्यानंतर जवळपास गेली 5 वर्ष तो टेस्ट क्रिकेटमध्ये परतलाच नाही. मात्र मीडिया रिपोर्ट्सद्वारे समोर येत असलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑलराउंडर हार्दिक पंड्याला संधी दिली जाऊ शकते.
हार्दिक पंड्या सध्या इंग्लंडमध्ये प्रॅक्टिस करत आहे. टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यात हार्दिकने भारताला वर्ल्ड कप जिंकवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. तर मागील महिन्यात पार पडलेल्या श्रीलंका विरुद्ध झालेल्या टी 20 सिरीजमध्ये देखील त्याने भाग घेतला होता. आता हार्दिक हा बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या टी 20 सीरिजमध्ये खेळताना दिसू शकतो.
Hardik Pandya in the practice session. pic.twitter.com/JW5vkVLUZq
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 12, 2024
क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा दुखापतग्रस्त होणारा हार्दिक पंड्या शेवटीचा टेस्ट सामना हा 2018 मध्ये खेळला होता. त्यानंतर 2019 मध्ये त्याच्या पाठीच्या खालच्या भागात दुखापत झाली आणि त्यावर सर्जरी करण्यात आली होती. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2023 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये सहभागी होण्यासाठी हार्दिकशी संपर्क करण्यात आला होता मात्र तेव्हा पंड्याने संघातील नियमित लाल चेंडू क्रिकेटपासून अंतर राखले. BCCI च्या एका वरिष्ठ सूत्राने पीटीआयचा हवाला देत म्हटले की, 'हे ऐकून आनंद झाला की हार्दिक लाल बॉलमध्ये गोलंदाजी करतोय. पण त्याने महत्वाच्या लोकांशी (मुख्य निवडकर्ता अजित आगरकर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा) याच्याविषयी बोलले आहेत का? हे लक्षात घेण्यासारखे आहे की कोणतेही देशांतर्गत लाल बॉल क्रिकेट न खेळता, त्याला सरळ टेस्ट सामन्यात खेळायला दिले लावू शकत नाही. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे तो दुलीप ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी गमावल्यानंतर बडोद्यासाठी रेड बॉल क्रिकेटमध्ये भाग घेतो की नाही हे पाहणं गरजेचं ठरेल'.