13 वर्षांपूर्वी धोनीच्या नेतृत्वात भारताने रचला होता इतिहास

टीम इंडियाने १३ वर्षापूर्वी असा रचला होता इतिहास

Updated: Sep 24, 2020, 04:58 PM IST
13 वर्षांपूर्वी धोनीच्या नेतृत्वात भारताने रचला होता इतिहास

मुंबई : आयसीसी टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानविरूद्ध टीम इंडिया नेहमी वरचढ ठरली आहे. पण १३ वर्षांपूर्वी २४ सप्टेंबर रोजी मिळालेला विजय हा त्यांच्यातील सर्वात मोठा आणि विशेष होता. खरं तर, या दिवशी पहिल्यांदा झालेल्या टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारताने शेवटच्या षटकांपर्यंतच्या रोमांचक सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून विजेतेपदावर आपले नाव कोरले होते. दिग्गजांच्या अनुपस्थितीत युवा क्रिकेटपटूंनी हे विजेतेपद महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात मिळवलं होतं.

मानसशास्त्रीयदृष्ट्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचे वजन जड मानले जात होते. गट सामन्यातील रोमांचक क्षणांमध्ये टीम इंडियाने सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला पराभूत केले. त्या सामन्यातही सामना शेवटच्या बॉलपर्यंत रंगला. परंतु नंतर सुपरओव्हरमध्ये भारताने पाकिस्तानी संघाला पराभूत केले.

अंतिम सामन्यात धोनीने नाणेफेक जिंकून आधी फलंदाजीचा निर्णय घेतला. इतर फलंदाज आऊट होत असताना गौतम गंभीरने एका टोकापासून बाजू सांभाळली होती. गंभीरने ५४ बॉलमध्ये ७५ धावा केल्या होत्या. रोहितने केवळ १६ बॉलमध्ये ३० धावा ठोकल्या. याचा परिणाम म्हणून भारतीय संघाने २० ओव्हरमध्ये ५ विकेट गमवत १५७ धावा केल्या. पाकिस्तानकडून उमर गुलने ४ ओव्हरमध्ये २८ धावा देऊन ३ विकेट घेतले होते.

पाकिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना इम्रान नाझीरने १४ बॉलमध्ये २८ रन केले होते. युनूस खानने २४ बॉलमध्ये २४ रन केले होते. इरफान पठाण आणि आरपी सिंग यांनी विकेट घेत पाकिस्तानला धक्के दिले. पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हक मैदानावर होता. त्याने काही चांगले शॉट्स खेळत सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत नेला.

शेवटची ओव्हर बाकी होती. पाकिस्तानला १३ रनची गरज होती. तर भारताला विजयासाठी एका विकेटची गरज होती. शेवट हरभजन सिंग किंवा जोगिंदर शर्मा हे दोनच पर्याय धोनीपुढे होते. धोनीने जोगिंदर शर्माच्या हातात बॉल देऊन सगळ्यांना आश्चर्यचकीत केले.

जोगिंदरच्या पहिल्या बॉल वाईड झाला. दुसरा बॉलवर त्याने रन नाही दिला. मिसबाहने तिसऱ्या बॉलवर सिक्स मारला. आता भारतीय फॅन्स टेन्शनमध्ये आले होते. धोनीचा निर्णय चुकला असं सगळ्यांना वाटत होतं. पुढच्या बॉलला मिसबाने मागे मारण्याचा प्रयत्न केला. पण बॉल सरळ श्रीसंतच्या हातात गेला आणि भारताचा विजय झाला. मिसबाहने ३८ बॉलमध्ये ४३ रन केले. पण विजय मिळवता आला नाही. भारताने पहिलाच वर्ल्डकप जिंकत इतिहास रचला. इरफान पठान हा 'मॅन ऑफ द मॅच' ठरला होता.