IPL 2020 : मुंबईने विजयाचं खातं उघडलं, कोलकात्याला धूळ चारली

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबईने विजयाचं खातं उघडलं आहे. 

Updated: Sep 24, 2020, 12:06 AM IST
IPL 2020 : मुंबईने विजयाचं खातं उघडलं, कोलकात्याला धूळ चारली
फोटो सौजन्य : आयएएनएस

अबु धाबी : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबईने विजयाचं खातं उघडलं आहे. कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा ४९ रननी दणदणीत विजय झाला आहे. मुंबईने ठेवलेल्या १९६ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याला २० ओव्हरमध्ये १४६/९ एवढाच स्कोअर करता आला. 

मुंबईच्या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात खराब झाली. स्कोअरबोर्डवर २५ रन असतानाच कोलकात्याचे दोन्ही ओपनर माघारी परतले होते. यानंतर दिनेश कार्तिक आणि नितीश राणाने कोलकात्याचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना मोठी मजल मारता आली नाही. कार्तिक आणि नितीश आऊट झाल्यानंतर मुंबईच्या बॉलरनी कोलकात्याला वारंवार धक्के दिले. कोलकात्याकडून आठव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या पॅट कमिन्सने १२ बॉलमध्ये सर्वाधिक ३३ रन केले. बुमराहच्या एका ओव्हरमध्ये कमिन्सने ४ सिक्स मारले. 

मुंबईकडून बोल्ट, पॅटिनसन, बुमराह आणि चहरला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. तर कायरन पोलार्डला १ विकेट घेण्यात यश आलं. या मॅचमध्ये कोलकात्याने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. 

पहिले बॅटिंग करताना मुंबईला क्विंटन डिकॉकच्या रुपात पहिला धक्का बसला. १ रन करून डिकॉक माघारी परतला. यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी कोलकात्याच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. रोहितने ५४ बॉलमध्ये ८० रन तर सूर्यकुमार यादवने २८ बॉलमध्ये ४७ रन केले. या दोघांच्या खेळीमुळे मुंबईने २० ओव्हरमध्ये १९५/५ एवढा स्कोअर केला. 

कोलकात्याकडून शिवम मावीने सर्वाधिक २ विकेट घेतल्या, तर सुनिल नारायण आणि आंद्रे रसेलला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. यंदाच्या मोसमातला मुंबईचा हा पहिलाच विजय आहे. सोबतच युएईच्या जमिनीवरचाही मुंबईचा हा पहिलाच विजय ठरला. याआधी चेन्नईविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये मुंबईला पराभवाचा धक्का बसला होता. तर २०१४ साली भारतातल्या निवडणुकांमुळे आयपीएलचे काही सामने युएईमध्ये झाले होते, तेव्हा एकाही सामन्यात मुंबईचा विजय झाला नव्हता. 

कोलकात्याविरुद्धच्या या विजयामुळे मुंबईची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे.