Ricky Ponting On Bumrah: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँन्टिंगने भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहचा, 'भारताचा महान वेगवान गोलंदाज' असा उल्लेख केला आहे. त्याने बुमराहची तुलना कर्टली ॲम्ब्रोस आणि ग्लेन मॅकग्रा यासारख्या दिग्गज गोलंदाजांबरोबर केली आहे. बुमराह हा गेल्या काही वर्षांमध्ये भारताचा सर्वात महत्त्वाच्या खेळाडूंपैकी आणि एकट्याच्या जीवावर सामना फिरवणारा खेळाडू ठरला आहे, हे नाकारता येणार नाही. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पर्थमधील पहिल्या कसोटीत या वेगवान गोलंदाजाने पुन्हा एकदा आपलं कौशल्या दाखवून दिलं. बुमराहने या सामन्यात आठ विकेट्स घेतल्या. रोहित शर्मा पहिली कसोटी खेळत नसल्याने बुमराहने कर्णधारपद भूषवत भारताला 295 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. बुमराहच्या नावावर आता 41 कसोटी सामन्यांमध्ये 20.06 च्या सरासरीने 181 विकेट्सची नोंद झाली आहेत. मात्र असं असतानाच पॉन्टिंगने आपण बुमरहासमोर कशी फलंदाजी केली असती याबद्दलही भाष्य केलं आहे.
“कर्णधाराने स्वत: ठामपणे उभे राहणे मला खूप महत्वाचे वाटते. खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये तो जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज का आहे हे त्याने पहिल्या कसोटीमध्ये सर्वांना दाखवून दिले. त्याने तिथे काय केलं हे पाहणं महत्त्वाचं आहे. फक्त पहिल्या डावातच नाही तर त्या संपूर्ण खेळामध्ये वेग, सातत्य, चेंडू स्वींग करण्याची क्षमता, सतत स्टंपजवळ गोलंदाजी करणे, त्रिफळा उडवण्याची क्षमता या साऱ्या गोष्टींचा विचार केला तर तो इतरांपेक्षा फारच उजवा ठरला,” असं पॉन्टिंगने 'आयसीसी'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
“मला वाटते की तो नक्कीच भारताच्या महान वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. तो तिन्ही फॉरमॅटमध्ये जेवढं क्रिकेट खेळला आहे तेवढं त्याच्या आधीचे अनेक खेळले नाहीत. मी लोकांना सांगू शकतो शकतो की, T20 क्रिकेट, एकदिवसीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटमध्ये तो सध्या सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे," असंही पॉन्टिंग म्हणाला. "हे सर्व मी केवळ त्याने घेतलेल्या विकेट्सबद्दल बोलत नाहीये. हे सारं मी दीर्घ कालावधीसाठी उच्च स्तरावर कामगिरी करण्याबद्दलच्या क्षमतेचा विचार करुन बोलत आहे. आपण पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पाहिले की जेव्हा त्याच्या गोलंदाजीसाठी योग्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा तो किती चांगली कामगिरी असू शकतो. जर तो सध्या करतोय तशीच कामगिरी करत राहिला तर ग्लेन मॅक्सवेलने जे सांगितले ते बरेच लोक म्हणतील याची मला खात्री आहे," असंही पॉन्टिंग म्हणाला.
बुमराहची ॲम्ब्रोस आणि मॅकग्राशी तुलना करताना पाँटिंग पुढे म्हणाला, "हे दिग्गज गोलंदाज समोरच्या संघावर दबाव वाढवण्याचे काम करायचे. कर्टली ॲम्ब्रोसही हेच करायचे आणि ग्लेन मॅकग्राही हेच करत होता. कोणत्याही महान वेगवान गोलंदाजांप्रमाणेच हे लोक धावा करणे आव्हानात्मक बनवतात."
“तुम्हाला त्याच्या (बुमराह) गोलंदाजीवर धावा करु शकत नाही. तुम्हाला एकही धावा सहज मिळत नाही. सर्वोत्कृष्ट फलंदाजांसाठी अशा गोलंदाजांसमोर धावसंख्या करणे अवघड बनवते. याचं प्रेशर वाढतं जातं आणि नंतर फलंदाज अस्वस्थ होऊ लागतात. जेव्हा तुम्ही टिकून राहण्याला प्राधान्य देतात धावा करण्याचा विचार करत नाही तेव्हा तुम्ही एक फलंदाज म्हणून तुमच्या अंतःप्रेरणेबद्दल विसरता. अशा वेळेस फलंदाजी करणे खरोखर कठीण होते,” असं दिग्गज गोलंदांच्या कामगिरीबद्दल बोलताना म्हटलं.
मग, पॉन्टिंगला तू आता क्रिकेट खेळत असता तर बुमराहसारख्या व्यक्तीला कसे हाताळले असेल? असा प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न ऐकून पॉन्टिंग आधी हसला. त्यानंतर त्याने, "मी त्याला प्रत्येक चेंडूवर पुढे जाऊन मारलं असतं. मी विकेटच्या दिशेने धावत जाऊन त्याच्या डोक्यावरुन त्याला फटके मारेन," असं म्हटलं आणि तो हसला. “मी त्याच्या प्रत्येक बॉलवर प्रतिक्रिया देईन, पण मी त्याच्यासमोर दबावत येण्याऐवजी सतत धावा करण्याचा प्रयत्न करेन. मी म्हटल्याप्रमाणे, तो खूप चांगला आहे याचे कारण म्हणजे तो तुम्हाला धावा करू देत नाही. सर्वोत्तम गोलंदाज तुम्हाला धावा करू देत नाहीत याची दुसरी बाजू म्हणजे सर्वोत्तम फलंदाज गोलंदाजांना तशी गोलंदाजी करू देत नाहीत. मी देखील अशाच प्रकारे त्याला खेळून काढला असता,"