Mumbai Local News : रविवार म्हटलं की अनेकांसाठीच हा सुट्टीचा दिवस. याच सुट्टीच्या दिवशी भटकंती, खरेदी किंवा भेटीगाठींच्या निमित्तानं घराबाहेर पडण्याचा बेत असेल आणि त्यातही रेल्वेनं प्रवास करण्याचा विचार करत असाल तर रविवारचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, नाहीतर पश्चातापाची वेळ येईल. कारण, सुट्टीच्या दिवशी एकिकडे वाहतूक कोंडीची समस्या डोकं वर काढताना दिसेल आणि दुसरीकडे मात्र रेल्वेच्या दिरंगाईमुळं प्रवासाचा खोळंबासुद्धा अटळ अशीच परिस्थिती पाहायला मिळेल.
रविवारी मध्य रेल्वेवर माटुंगा- मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.30 वाजल्यापासून दुपारी 3.30 पर्यंत चार तासांचा तसेच अप ब्लॉक असेल. तर, डाऊन हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते चुनाभट्टी/वांद्रे या स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.40 वाजेपर्यंत विविध काही तांत्रिक आणि देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
ब्लॉक कालावधीत पर्यायी वेळापत्रक...
मध्य रेल्वेमार्गावरील ब्लॉकदरम्यान CSMT वरून सकाळी 10.58 ते दुपारी 3.10 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील रेल्वे माटुंगा स्थानकातून धीम्या मार्गावर वळवल्या जातील. तर, माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान मात्र या रेल्वे त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील.
ठाण्याहून सकाळी 11.25 ते दुपारी 3.27 या वेळेत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड, माटुंगा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. दरम्यानच्या काळात रेल्वे साधारण 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावतील.
पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ आणि गोरेगाव या स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर शनिवारी मध्य रात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. सिग्नल यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असून शनिवारी मध्य रात्री 11.30 ते रविवारी पहाटे 3.30 दरम्यान हा चार तासांचा ब्लॉक घेतला जाईल.
तिथं हार्बर मार्गावर सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 पर्यंत वाशी/ बेलापूर/ पनवेलसाठी सुटणाऱ्या सेवा आणि CSMT हून याच वेळेत वांद्रे / गोरेगावसाठी सुटणाऱ्या सेवा कायम राहतील. तर, पनवेल / बेलापूर / वाशीहून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत मुंबई सीएसएमटीसह गोरेगाव/वांद्रे इथून 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत सीएसएमटीच्या दिशेनं सुटणाऱ्या सेवा रद्द राहतील.