...म्हणून त्या बॉलला रन काढली नाही, दिनेश कार्तिकचं स्पष्टीकरण

न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या टी-२०मध्ये भारताचा ४ रननी पराभव झाला. 

Updated: Feb 13, 2019, 09:01 PM IST
...म्हणून त्या बॉलला रन काढली नाही, दिनेश कार्तिकचं स्पष्टीकरण title=

मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या टी-२०मध्ये भारताचा ४ रननी पराभव झाला. या पराभवामुळे भारताला सीरिज २-१नं गमवावी लागली. पण सामन्यातल्या पराभवानंतर दिनेश कार्तिकवर टीकेची झोड उठली. शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी १६ रनची गरज होती, पण भारताला ११ रनच करता आल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये दिनेश कार्तिकनं रन काढून कृणाल पांड्याला स्ट्राईक दिला नाही. यानंतर सोशल मीडियातून कार्तिकवर निशाणा साधण्यात आला. या पराभवाला दिनेश कार्तिक जबाबदार असल्याचा आरोपही क्रिकेट रसिकांनी केला. या सगळ्या टीकेनंतर आता खुद्द दिनेश कार्तिकनेच स्पष्टीकरण दिलं आहे.

'मला सिक्स मारता येईल, असं मला खरंच वाटत होतं. भारताची अवस्था १४५/६ अशी होती. यानंतर मी आणि कृणालनं चांगली बॅटिंग केली. न्यूझीलंडच्या बॉलरना दबावात अणण्यात आम्ही दोघं यशस्वी झालो. ती १ रन नाकारल्यानंतर, मला सिक्स मारता येईल, असा विश्वास होता', अशी प्रतिक्रिया कार्तिकनं दिली.

१६व्या ओव्हरमध्ये भारताची अवस्था १४५/६ अशी असताना जिंकण्यासाठी २८ बॉलमध्ये ६८ रनची आवश्यकता होती. या परिस्थितीतून कार्तिक आणि कृणाल पांड्यानं भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं होतं. या दोघांनी २८ बॉलमध्ये नाबाद ६३ रनची भागीदारी केली.

'मधल्या फळीतील बॅट्समन असल्यामळे अनेकवेळा तुम्हाला मोठा शॉट खेळण्यासाठी स्वत:वर विश्वास ठेवावा लागतो. याचबरोबर तुमच्यासोबत बॅटिंग करणाऱ्या खेळाडूवरही तुम्ही विश्वास ठेवणं, तितकच महत्त्वाचं असतं. त्यावेळी मला सिक्स मारून भारताला जिंकवता आलं नाही, पण अशा गोष्टी क्रिकेटमध्ये होतच असतात. काही वेळा तुम्हाला सिक्स मारता येते, पण कधीतरी बॉलर चांगली बॉलिंग करतो. त्यादिवशी टीम साऊथीनं शेवटच्या ओव्हरमध्ये चांगले यॉर्कर टाकले. तणावामध्ये त्यानं चांगली बॉलिंग केली. त्यानं छोटीशी चूक जरी केली असती, तरी आम्ही सामना जिंकलो असतो', असं कार्तिक म्हणाला.

शेवटच्या ओव्हरमध्ये एक रन न काढल्यामुळे टीम प्रशासनानं काही चर्चा केली का? असा प्रश्न कार्तिकला विचारण्यात आला तेव्हा, 'टीम प्रशासनाला त्या परिस्थितीबद्दल तसंच आम्हा दोघांना जे शक्य आहे, ते आम्ही केल्याचं प्रशासनाला माहिती आहे. त्यादिवशी आम्हाला सर्वोत्तम करता आलं नाही. पण टीम प्रशासनाला हे कळलं.'

शेवटच्या ओव्हरमध्ये काय झालं?

शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला जिंकण्यासाठी १६ रनची गरज होती. ओव्हरच्या पहिल्या बॉलला कार्तिकनं २ रन घेतल्या. यानंतर दुसऱ्या बॉलवर एकही रन मिळाली नाही. तिसरा बॉल कार्तिकनं लाँग ऑनच्या दिशेनं खेळला, तरी दिनेश कार्तिकनं रन काढली नाही. कृणाल पांड्या खेळपट्टीच्या मध्यावर आला तरी कार्तिकनं रन काढण्याची इच्छा दाखवली नाही. तिसऱ्या बॉलवर कार्तिकनं रन काढली असती तर भारताला विजयासाठी ३ बॉलमध्ये १३ रनची गरज पडली असती, आणि कृणाल पांड्या बॅटिंगला आला असता. कृणाल पांड्या त्यावेळी १२ बॉलमध्ये २५ रनवर खेळत होता आणि तो चांगल्या लयीतही होता, पण तरी त्याला बॅटिंगची संधी मिळाली नाही.

यानंतर चौथ्या बॉलवर दिनेश कार्तिकनं मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण यामध्ये तो अपयशी ठरला. चौथ्या बॉलवर कार्तिकला एकच रन काढता आली. पाचव्या बॉलवर कृणाल पांड्यानं १ रन घेऊन पुन्हा कार्तिकला बॅटिंगची संधी दिली. शेवटच्या बॉलवर भारताला जिंकण्यासाठी ११ रनची गरज होती. पण बॉलरन वाईड बॉल टाकल्यामुळे भारताला एक रन आणि बॉल अधिकचा मिळाला. आता शेवटच्या बॉलवर भारताला १० रनची आवश्यकता होती. हे आव्हान अशक्य होतं. दिनेश कार्तिकनं शेवटच्या बॉलवर सिक्स तर मारली, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

तब्बल १५ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या दिनेश कार्तिकनं भारताकडून २६ टेस्ट, ९१ वनडे आणि ३० टी-२० मॅच खेळल्या आहेत. मागच्या २४ महिन्यांमध्ये कार्तिकनं भारताकडून २० वनडे आणि २१ टी-२० मॅच खेळल्या. याचबरोबर ८ वर्षानंतर त्यानं टेस्ट क्रिकेटमध्येही पुनरागमन केलं. 

मुंबई इंडियन्सचा केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिकवर निशाणा