बॉक्सिंगच्या रिंगणात मानापमान नाट्य; मेरी कोम-निखत झरीनमध्ये जुंपली

मेरी कोमने निखत झरीनला ९-१ अशा फरकाने धूळ चारली.

Updated: Dec 28, 2019, 05:24 PM IST
बॉक्सिंगच्या रिंगणात मानापमान नाट्य; मेरी कोम-निखत झरीनमध्ये जुंपली title=

नवी दिल्ली: सहावेळा जगज्जेतेपदाची मानकरी ठरलेल्या मेरी कोमने शनिवारी ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीसाठी झालेल्या लढतीत निखत झरीनला ९-१ अशा फरकाने धूळ चारली. मात्र, मेरी कोमने खिलाडूवृत्ती न दाखवल्याचा आरोप करत निखत झरीनने वादाचा नवा अंक सुरु केला. यापूर्वी निखत झरीनने बॉक्सिंग प्रशासकांवर पक्षपातीपणाचा आरोप करत मेरी कोमला जाहीर लढतीचे आव्हान दिले होते. मेरी कोम चाचणीपासून दूर पळते आणि ऑलिंपिक पात्रतेसाठी दोन हात करण्याची तिची तयारी नाही, असा आरोप २३ वर्षीय झरीनने केला होता. हे आव्हान स्वीकारत मेरी कोम ऑलिम्पिक पात्रतेसाठी झालेल्या बॉक्सिंग चाचणीत सहभागी झाली होती. अखेर शनिवारी झालेल्या अंतिम लढतीत मेरी कोमने निखत झरीनचा सहजपणे पराभव केला. 

मात्र, या सामन्यानंतर मेरी कोमने आपल्याशी हस्तांदोलन न करू अखिलाडू वृत्तीचे दर्शन घडवल्याचा आरोप निखतने केला. मला मेरी कोमचे वागणे अजिबात आवडलेले नाही. सामन्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर मी तिला आलिंगन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही. मी लहान असले तरी वरिष्ठ खेळाडुंकडून आम्हाला सन्मान मिळणे अपेक्षित आहे, असे झरीनने म्हटले होते. 

तत्पूर्वी मेरी कोमनेही आपली बाजू स्पष्ट केली. मी तिच्याशी हस्तांदोलन का करावे? तिला आदर हवा असेल तर तिने सर्वप्रथम इतरांचा आदर केला पाहिजे. मला अशा स्वभावाच्या व्यक्ती बिलकूल आवडत नाहीत. तुमचा मुद्दा रिंगणाच्या आतमध्ये असताना सिद्ध करा, बाहेर नव्हे, असे सांगत मेरी कोमने निखत झरीनला फटकारले. 

निखत झरीनने अकारण मला वादात ओढले. मी निवड चाचणीसाठी कधीही नकार दिला नव्हता. तरीही माझ्या योग्यतेविषयी शंका उपस्थित केल्यास, मला राग येणार नाही का? मीदेखील माणूस आहे, मलाही काही गोष्टींचा राग येतो, असे मेरी कोमने प्रसारमाध्यमांना सांगितले.