ढाका : कोरोना व्हायरसचा फटका आता क्रिकेटपटूंनाही बसू लागला आहे. बांगलादेशचा क्रिकेटपटू मशरफी मुर्तजाला कोरोनाची लागण झाली आहे. आयसीसी आणि बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी मुर्तजाला लवकारत लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याआधी बांगलादेशमधलं वृत्तपत्र ढाका ट्रिब्यूनने मशरफी मुर्तजाला कोरोना झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
Wishing Bangladesh's Mashrafe Mortaza a speedy recovery https://t.co/k4g58TmrLf
— ICC (@ICC) June 21, 2020
मशरफी मुर्तजाला गुरुवार रात्रीपासून ताप आला होता. यानंतर शुक्रवारी त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली आणि शनिवारी त्याचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. मशरफी मुर्तजावर सध्या घरातच उपचार सुरू आहेत. मशरफी मुर्तजाची आणि त्याच्या कुटुंबाची तब्येत ठीक आहे, असं वृत्तपत्राने सांगितलं आहे.
मशरफी मुर्तजाने फेब्रुवारी महिन्यात झिम्बाब्वेविरुद्धच्या सीरिजनंतर कर्णधार पदाचा राजीनामा दिला. मुर्तजाने बांगलादेशसाठी २२० मॅचमध्ये २७० विकेट घेतल्या. तर ३६ टेस्टमध्ये त्याला ७८ विकेट आणि ५४ टी-२० मॅचमध्ये ४२ विकेट मिळाल्या.
बांगलादेशचा क्रिकेटपटू तमीम इक्बालचा भाऊ नफीस यालाही कोरोनाची लागण झाली. नफीसने २००३ साली बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. नफीसने ११ टेस्ट आणि १६ वनडेमध्ये बांगलादेशचं प्रतिनिधीत्व केलं.