close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आशिया कपमध्ये भारताविरुद्ध खेळलेल्या खेळाडूवर मॅच फिक्सिंगचे आरोप

मॅच फिक्सिंगच्या आरोपाप्रकरणी आयसीसीनं ३ खेळाडूंचं निलंबन केलं आहे.

Updated: Oct 9, 2018, 05:14 PM IST
आशिया कपमध्ये भारताविरुद्ध खेळलेल्या खेळाडूवर मॅच फिक्सिंगचे आरोप

दुबई : मॅच फिक्सिंगच्या आरोपाप्रकरणी आयसीसीनं ३ खेळाडूंचं निलंबन केलं आहे. यामध्ये मागच्या महिन्यात भारताविरुद्ध आशिया कपमध्ये खेळणाऱ्या हाँगकाँगच्या नदीम अहमदसह हाँगकाँगच्या ३ खेळाडूंचं नाव समोर आलं हे. या तिन्ही खेळाडूंवर २०१४ साली मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप आहे. नदीम अहमद, हसीब अमजद आणि नदीमचा भाऊ इरफान अहमद यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हे तिन्ही खेळाडू पाकिस्तानी वंशाचे आहेत.

या तिघांमध्ये स्पिनर नदीमचं नाव प्रमुख आहे. नदीमनं भारताविरुद्ध १८ सप्टेंबरला आशिया कपमध्ये मॅच खेळली होती. या मॅचमध्ये नदीमनं १० ओव्हरमध्ये ३९ रन दिले होते, पण त्याला एकही विकेट मिळाली नव्हती.

इरफान २०१४ साली आणि हसीब २०१६ साली हाँगकाँगकडून क्रिकेट खेळले होते. इरफानवर मॅच फिक्सिंगचे ९ वेगवेगळे आरोप लावण्यात आले आहेत. आयसीसीनं त्याला एप्रिल २०१६ पासून निलंबित केलं आहे. नदीम आणि हसीबला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. नदीम अहमद आणि हसीब अमजदवर भ्रष्टाचारविरोधी नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. आयसीसीनं सोमवारी या तिन्ही खेळाडूंवर १९ आरोप लावले आहेत.

या तिन्ही खेळाडूंवर चौकशी पूर्ण होईपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. आशिया कपमध्ये हाँगकाँगला १० वर्षानंतर संधी मिळाली होती. याआधी २००८ साली हाँगकाँग आशिया कपमध्ये होता. तेव्हाही हाँगकाँग भारत आणि पाकिस्तानच्या ग्रुपमध्ये होता.

अशी झाली भारत-हाँगकाँग मॅच

भारतानं आशिया कपमध्ये हाँगकाँगचा २६ रननी पराभव केला होता. या मॅचमध्ये विजय मिळवताना भारताला घाम फुठला होता. भारतानं पहिले बॅटिंग करत २८५ रन केले होते. यानंतर हाँगकाँगनं ८ विकेट गमावून २५९ रन केले.