पृथ्वी शॉच्या शतकामुळे स्विगी आणि फ्रीचार्ज अडचणीत

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमधून भारताच्या पृथ्वी शॉनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

Updated: Oct 9, 2018, 04:43 PM IST
पृथ्वी शॉच्या शतकामुळे स्विगी आणि फ्रीचार्ज अडचणीत

राजकोट : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमधून भारताच्या पृथ्वी शॉनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये शतक करण्याचा विक्रम पृथ्वी शॉनं केला. पण पृथ्वी शॉच्या या शतकामुळे दोन बड्या कंपन्या अडचणीत आल्या आहेत. स्विगी आणि फ्रीचार्ज या कंपन्यांनी पृथ्वी शॉचं अभिनंदन करताना स्वत:च्या ब्रॅण्डचं प्रमोशन केलं. या दोन कंपन्यांबरोबरच अमूल आणि मुंबई पोलिसांनीही पृथ्वी शॉचं अभिनंदन करताना प्रमोशन केलं. या प्रमोशनवर पृथ्वी शॉला मॅनेज करणारी कंपनी बेसलाईन वेंचर्सनं आक्षेप घेतले आहेत.

पृथ्वी शॉचं व्यावसायिक हित जपण्यासाठी बेसलाईन वेंचर्स या कंपनीचा शॉबरोबर करार झाला आहे. त्यामुळे बेसलाईन वेंचर्सनं स्विगी आणि फ्रीचार्जला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या दोन्ही कंपन्यांकडे बेसलाईन वेंचर्सनं एक-एक कोटी रुपयाच्या भरपाईची मागणी केली आहे. स्विगी ही फूड डिलिव्हरीची कंपनी आहे. तर फ्रीचार्ज ई कॉमर्स वेबसाईट आहे.

हा पृथ्वी शॉबरोबरच नाही तर आमच्यावरही अन्याय आहे कारण आम्ही सध्या पृथ्वीचे मुख्य स्पॉन्सर आहोत, अशी प्रतिक्रिया बेसलाईन वेंचर्सच्या तुहिन मिश्रा यांनी दिली आहे. आम्ही इतर कंपन्यांवरही कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहोत, असं मिश्रा म्हणाले.

बेसलाईन वेंचर्सकडून कायदेशीर नोटीस मिळाल्याचं स्विगीनं मान्य केलं आहे. याप्रकरणी आमचा कायदे विभाग पुढच्या कारवाईबद्दल निर्णय घेईल, असं स्विगीनं सांगितलं. शॉनं मागच्याच वर्षी बेसलाईन वेंचर्ससोबत एक कोटी रुपयांचा करार केला होता.

अमूलनंही केलं प्रमोशन

स्विगी आणि फ्रीचार्जबरोबरच अमूलनंही त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून पृथ्वी शॉला शतकानंतर शुभेच्छा दिल्या. वाद वाढल्यानंतर फ्रीचार्जनं त्यांचं ट्विट डिलीट केलं असलं तरी अमूल आणि स्विगीनं मात्र त्यांचं ट्विट अजूनही तसंच ठेवलं आहे.

मुंबई पोलिसांचंही ट्विट

मुंबई पोलिसांनीही पृथ्वी शॉच्या शतकाचा आधार घेत नागरिकांना जागरूक करण्यासाठी ट्विट केलं.

पृथ्वी शॉचं रेकॉर्ड

पृथ्वी शॉनं पहिल्या टेस्टमध्ये ९९ बॉलमध्ये शतक झळकावलं. शॉनं १८ वर्ष आणि ३२९ दिवसांच्या वयात पहिलं शतक केलं. शॉच्या आधी सचिन तेंडुलकरनं १७ वर्ष आणि १०७ दिवसांमध्ये शतक केलं होतं. पृथ्वी शॉ पहिल्याच मॅचमध्ये शतक करणारा १५वा भारतीय खेळाडू बनला आहे.