सचिनच्या नावाचा चुकीचा उल्लेख केल्यामुळे ट्रम्प ट्रोल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आहेत.

Updated: Feb 25, 2020, 06:31 PM IST
सचिनच्या नावाचा चुकीचा उल्लेख केल्यामुळे ट्रम्प ट्रोल

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आहेत. सोमवारी अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये ट्रम्प यांनी जमलेल्या प्रेक्षकांसमोर भाषण केलं. या भाषणामध्ये ट्रम्प यांनी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीचा उल्लेख केला. विराट आणि सचिन हे महान क्रिकेटपटू असल्याचं ट्रम्प म्हणाले. पण सचिनच्या नावाचा उल्लेख ट्रम्प यांनी चुकीचा केला, त्यामुळे ट्रम्प ट्रोल होत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी बॉलीवूडपासून खेळाचं कौतुक केलं. 'भारतामध्ये वर्षाला २ हजार चित्रपट प्रदर्शित होतात. जगभरातली लोकं भारताच्या भांगडा, संगीत, डान्स आणि रोमान्सचा आनंद घेतात,' असं ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणात डीडीएलजेचाही उल्लेख केला.

सचिन तेंडुलकरचं नाव घेताना डोनाल्ड ट्रम्प सूचिन म्हणाले. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सोशल मीडियावर टीका होऊ लागली. आयसीसीनेही ट्रम्प यांना ट्रोल करणारं एक ट्विट केलं आहे.

ट्रम्प यांनी फक्त सचिनच नाही तर इतर काही नावंही चुकीची घेतली. ट्रम्प त्यांच्या भाषणात स्वामी विवेकानंदर यांना स्वामी विवेकामानन्न आणि विराट कोहलीला विराट कोली म्हणाले. चायवाला हा शब्द ट्रम्प यांनी चीवाला असा वापरला.