दुबई : आयसीसीनं बियर बनवणाऱ्या कंपनीसोबत ५ वर्षांचा करार केला आहे. बिरा ९१ असं या कंपनीचं नाव आहे. बिरा ९१ ही कंपनी २०२३ पर्यंत आयसीसीची अधिकृत स्पॉन्सर असेल. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप, आयसीसी टी-२० वर्ल्ड कप, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप, आयसीसी अंडर १९ वर्ल्ड कप आणि महिलांच्या चॅम्पियनशीपसाठी बिरा ९१ आयसीसीची अधिकृत स्पॉन्सर असेल. बिरा ९१ या कंपनीचं खेळामधला हा पहिलाच स्पॉन्सरशीप करार आहे. आयसीसी स्पर्धांदरम्यान प्रसारण, डिजीटल प्रसारण, मैदान आणि मैदानाच्या आसपासच्या परिसरामध्ये बिरा ९१ या कंपनीची वेगवेगळी उत्पादन दिसतील.
क्रिकेटचे कोट्यवधी तरुण चाहते आहेत त्यामुळे अशापद्धतीनं स्पॉन्सर मिळणं नैसर्गिक असल्याची प्रतिक्रिया आयसीसीचे अधिकारी कॅम्बेल जेमीसन यांनी दिली आहे. बिरा ९१चं आम्ही क्रिकेटच्या कुटुंबात स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया आयसीसीनं दिली आहे. भारतीय ब्रॅण्ड असलेल्या बिरा ९१ ला आयसीसीची स्पॉन्सरशीप मिळाल्यामुळे भारताबाहेरही व्यापार वाढवायला मदत होईल, असं कॅम्बेल म्हणाले.
एक भारतीय ब्रॅण्ड ग्लोबल करण्यासाठी आयसीसीची ही स्पॉन्सरशीप आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पिढीजात बदल होत आहेत. वेगवेगळे क्रिकेटचे फॉरमॅट येत असल्यामुळे नवीन देश आणि नवीन प्रेक्षक क्रिकेटला मिळत आहेत. क्रिकेटच्या या जल्लोषात सहभागी होण्यासाठी आम्ही उत्साही आहोत, अशी प्रतिक्रिया बिरा ९१ चे संस्थापक आणि सीईओ अंकुर जैन यांनी दिली आहे.
आयसीसीमध्ये सध्या एकूण १०४ देश सदस्य आहेत. सदस्य देशांची ही संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. टी-२० क्रिकेटचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे तरुण आणि महिलाही खेळाकडे आकर्षित होण्याचं प्रमाण वाढलं आहे.