दुबई : श्रीलंकेकडून घरच्याच मैदानात झालेल्या ०-२च्या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेचं टेस्ट क्रमवारीमध्ये मोठं नुकसान झालं आहे. दक्षिण आफ्रिका टेस्ट क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. तर याचा फायदा न्यूझीलंडच्या टीमला झाला आहे. न्यूझीलंडची टीम टेस्ट क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. न्यूझीलंडची टेस्ट क्रिकेटमधली ही सर्वोत्तम क्रमवारी आहे. पहिल्यांदाच न्यूझीलंडची टीम आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. ११६ पॉईंटसह भारत टेस्ट क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
दक्षिण आफ्रिकेत मिळालेल्या ऐतिहासिक विजयाचा श्रीलंकेला मात्र फायदा झाला नाही. श्रीलंका सहाव्या क्रमांकावर कायम असली, तरी त्यांना चार पॉइंटचा फायदा झाला आहे. श्रीलंकेचे ९३ रेटिंग पॉइंट आहेत. तर न्यूझीलंडचे १०७ आणि दक्षिण आफ्रिकेचे १०५ रेटिंग पॉइंट आहेत. ऑस्ट्रेलिया १०४ पॉइंटसह चौथ्या आणि इंग्लंडही १०४ पॉइंटसह पाचव्या क्रमांकावर आहे.
बॅट्समनच्या क्रमवारीमध्ये श्रीलंकेच्या कुशल मेंडिस आणि ओशाडा फर्नांडो यांना फायदा झाला आहे. मेंडिस १८व्या क्रमांकावर आणि फर्नांडोनं ३५ स्थानांची उडी घेत ६५वं स्थान पटकावलं आहे. निरोशन डिकवेला याचाही क्रमवारीत फायदा झाला आहे. निरोशन डिकवेलानं आठ स्थानांची झेप घेऊन ३७वा क्रमांक गाठला आहे. बॅट्समनच्या टॉप १० क्रमवारीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पण दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक एक स्थान खाली नवव्या क्रमांकावर आला आहे. विराट कोहली पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
बॉलिंगच्या क्रमवारीमध्ये मात्र दक्षिण आफ्रिकेचा फायदा झाला आहे. फास्ट बॉलर डुआने ओलिव्हर तीन स्थान वरती १९व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर कागिसो रबाडा आणि वर्नन फिलेंडर चौथ्या क्रमांकावर कायम आहेत.
श्रीलंकेचा सुरंगा लकमलही तीन स्थान वरती ३०व्या क्रमांकावर आणि विश्वा फर्नाडो सहा स्थान वरीत ४३व्या क्रमांकावर गेले आहेत. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स पहिल्या क्रमांकावर, भारताचा रवींद्र जडेजा पाचव्या क्रमांकावर आणि आर. अश्विन १०व्या क्रमांकावर आहेत.