बंगळुरू : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा निसटता पराभव झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने या २ मॅचच्या सीरिजमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसरी मॅच उद्या २७ फेब्रुवारीला बंगळुरूमध्ये खेळवण्यात येणार आहे. सीरिजच्या दृष्टीने दोन्ही टीमसाठी ही मॅच महत्वपूर्ण आहे. दुसरी मॅच जिंकून सीरिज जिंकण्याचा विचार ऑस्ट्रेलियाचा असेल. तर ही मॅच जिंकून सीरिज १-१ ने बरोबरीत करायचा भारताचा मानस असेल. ऑस्ट्रेलिया टीमला आतापर्यंत भारतात टी-२० सीरिज जिंकता आलेली नाही. त्यामुळे ही कामगिरी करण्याची संधी देखील ऑस्ट्रेलियाला आहे.
भारताला या दुसऱ्या मॅचमध्ये रेकॉर्ड करण्याची संधी आहे. भारताने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचा ११ टी-२० मॅचमध्ये पराभव केला आहे. उद्याच्या मॅचमध्ये जर भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर हा भारताचा १२वा विजय असेल. असे केल्यास भारत पाकिस्तानच्या रेकॉर्डची बरोबरी करेल. पाकिस्ताननं आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरोधात एकूण २० टी-20 मॅच खेळला आहे. त्यापैकी पाकिस्तानने १२ मॅचमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे जर उद्या ऑस्ट्रेलियाविरोधात होणारी मॅच भारताने जिंकली तर पाकिस्तानच्या रेकॉर्डची बरोबरी होईल.
भारताचा फास्टर बॉलर जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये १९ व्या ओव्हरमध्ये अवघ्या २ रन देऊन मॅच रंगतदार स्थितीत आणून ठेवली होती. पहिल्या मॅचमध्ये बुमराहनं ४ ओव्हरमध्ये १६ रन देऊन ३ विकेट घेतल्या. या कामगिरीनंतरही भारताचा पराभव झाला. या मॅचमध्ये बुमराहनं टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या ५० विकेट पूर्ण केल्या. यानंतर बुमराह आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद ५० विकेट घेणारा भारतीय खेळाडू ठरला. आता बुमराहच्या खात्यात ५१ विकेट आहेत. बुमराहनं ४१ टी-२० मॅचमध्ये ५१ विकेटचा पल्ला गाठला आहे.
उद्याच्या 27 फेब्रुवारीच्या दुसऱ्या मॅचमध्ये बुमराहला एक रेकॉर्ड करण्याची संधी आहे. भारताकडून आतापर्यंत टी-२० मध्ये आश्विनने सर्वाधिक विकेट घेतले आहेत. त्याने ४६ मॅचमध्ये ५२ विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे जर उद्याच्या दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये २ विकेट घेतल्या तर भारताकडून टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा मान हा बुमराहला मिळेल. तर १ विकेट घेतली तर आश्विन आणि बुमराह संयुक्तरित्या सर्वाधिक विकेट घेणार भारतीय बॉलर ठरतील.
भारताचा कॅप्टन विराट कोहली एका विक्रमापासून अवघ्या ९ रन दूर आहे. कोहलीने आतापर्यंत ६६ मॅचमध्ये २,१९१ रन केले आहेत. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये ९ रन केल्या तर त्याच्या टी-२० कारकिर्दीत २,२०० रन पूर्ण होतील. यासोबतच तो टी-२० मध्ये २,२०० रन पूर्ण करणारा क्रिकेटविश्वातील चौथा खेळाडू ठरेल.
याआधी टी-२० मध्ये तीन खेळाडूंनाच २,२०० पेक्षा जास्त रन करता आल्या आहेत. रोहित शर्माने टी-२० कारकिर्दीत २,३३१ रन केल्या आहेत. तर न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टील याने २,२७२ रन केल्या आहेत. पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू शोएब मलिक याने २,२६३ रन केले आहेत. विराटने उद्याच्या मॅचमध्ये ७३ रनची खेळी केल्यास तो शोएब मलिकाला पिछाडीवर टाकेल.
रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मध्ये विक्रम करण्याची संधी आहे. रोहित शर्माने आतापर्यंत ९४ मॅचमध्ये १०२ सिक्स मारले आहेत. सर्वाधिक सिक्स मारणाऱ्यांच्या यादीत रोहित तिसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक सिक्स मारण्याच्या बाबतीत वेस्टइंडिजचा विस्फोटक बॅट्समन क्रिस गेल आणि न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टील हे दोघे संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहेत. या दोघांनी आतापर्यंत प्रत्येकी १०३ सिक्स मारले आहेत. तर रोहितच्या नावावर १०२ सिक्सची नोंद आहे. त्यामुळे जर रोहितने उद्याच्या मॅचमध्ये २ सिक्स लगावले तर सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम त्याच्या नावे होईल.