WC 2023 : क्रिकेट चाहत्यांची निराशा होणार, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी आली मोठी बातमी

ODI World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत करोडो क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे ते पारंपारिक प्रतिस्पर्धा भारत-पाकिस्तान सामन्याकडे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. पण त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. 

राजीव कासले | Updated: Oct 12, 2023, 07:39 PM IST
WC 2023 : क्रिकेट चाहत्यांची निराशा होणार, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी आली मोठी बातमी title=

World Cup 2023 India vs Pakistan : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील ज्या सामन्याची जगभरातील क्रिकेचप्रेमी आतुरतेने वाट पाहातायत तो सामना आता अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलाय. पारंपारिक प्रतिस्पर्धा भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) येत्या शनिवारी म्हणजे 14 ऑक्टोबरला आमने सामने येणार आहेत. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) खेळला जाणार आहे. दोनही संघ आपले पहिले दोनही सामने जिंकलेत, आणि आता विजयाची हॅटट्रीक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या सामन्यासाठी भारत-पाकिस्तानचे क्रिकेट संघ अहमदाबादमध्ये दाखल झालेत. 

भारत-पाकिस्तान सामन्याची सर्व तिकिटं आधीच हाऊसफुल झाली आहेत. नरेंद्र मोदी स्टेडिअमची प्रेक्षक क्षमता एक लाख तीस हजार इतकी आहे. ही सर्व तिकिटं विकली गेली आहेत. यावरुन भारत-पाकिस्तान सामन्याची चाहत्यांमध्ये किती उत्सुकता आहे याची कल्पना येईल. पण या सामन्यापूर्वी एक बातमी समोर आली असून यामुळे चाहत्यांची निराशा होऊ शकते. हवामान विभागाने 14 आणि 15 ऑक्टोबरला अहमदाबादसह गुजरात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता (Rain Prediction) वर्तवली आहे. हवामान विभागाची हा अंदाज खरा ठरला तर भारत-पाकिस्तान सामन्यावर त्याचे परिणाम होऊ शकतात. विशेष म्हणजे या सामन्यासाठी रिझर्व्ह डेही ठेवण्यात आलेला नाही.
 
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य आणि उत्तर गुजरातमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 14 आणि 15 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण असेल, तर हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. बंगाल-अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

एशिया कपमध्येही रद्द झाला होता सामना
याआधी एशिया कप स्पर्धेतही पावसामुळे भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्यात आला होता. श्रीलंकेत झालेल्या या सामन्यात भारताने पहिली फलंदाजी करताना 266 धावा केल्या होत्या. पण त्यानंतर पाऊस सुरु झाला आणि सामनाच रद्द करण्यात आला. 

भारत-पाकिस्तान कामगिरी
विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ आतापर्यंत सातवेळा आमने सामने आले आहेत. 1992 विश्वचषकात हे दोनही संघ पहिल्यांदा भिडले. त्यानंतर 1996, 1999, 2003, 2011, 2015 आणि 2019 विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तानदरम्यान सामना रंगला. या प्रत्येक सामन्यात भारताने पाकिस्तानला धुळ चारलीय. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तानला भारताविरुद्ध एकही सामना जिंकता आलेला नाही. 

या खेळाडूंवर असणार नजर
भारत-पाकिस्तान सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, पाकिस्तान कर्णधार बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि पाकचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीवर सर्वांची नजर असणार आहे. 

भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकुर.

पाकिस्तान संघ
इमाम उल हक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन अफरीदी, हारिस रऊफ, मोहम्मद वसीम जूनियर, आगा सलमान, उसामा मीर, अब्दुल्ला शफीक