सलग 3 सामने हरणारा न्यूझीलंड संघ अडणचीत, प्लेईंग XI निवडणंही कठिण... सेमीफायनलची वाट बिकट

New Zealand Cricket: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. पण आता हाच संघ सेमीफायनलमधून बाहेर पडण्याच्या वाटेवर आहे त्यातच आता न्यूझीलंडच्या संघाला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. 

राजीव कासले | Updated: Nov 2, 2023, 05:06 PM IST
सलग 3 सामने हरणारा न्यूझीलंड संघ अडणचीत,  प्लेईंग XI निवडणंही कठिण... सेमीफायनलची वाट बिकट title=

New Zealand Player Injury : आयसीसी विश्वचषक स्पर्धा (ICC World Cup 2023) जसजशी अंतिम टप्प्यात पोहोचतेय तसतसा प्रत्येक सामना चुरशीचा होत चालला आहे. पॉईंटटेबलमध्येही (WC PointTable) मोठा उलटफेर पाहिला मिळतोय. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ वगळता उरलेल्या दोन जागांसाठी चांगलीच चुरस आहे. न्यूझीलंड संघाने (New Zealand) विश्वचषक स्पर्धेत दमदार सुरुवात केली. सुरुवातीच्या चारही सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवत थेट पहिल्या स्थानावर झेप घेतली. न्यूझीलंड सहज सेमीफायनल गाठणार असं जवळपास निश्चित मानलं जात होतं. पण आता परिस्थिती बदलली आहे. न्यूझीलंड संघ आता सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. 

त्यातच आता न्यूझीलंड संघाला आणखी एक धक्का बसला आहे. न्यूझीलंड संघाला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. सुरुवातील कर्णधार केन विल्यमन्सन दुखापतग्रस्त झाला. पण आता दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी वाढत चालली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात वेगवान गोलंगाज मॅट हेनरी (Matt Henry) आणि अष्टपैलू खेळाडू जिम्मी नीशम दुखापतग्रस्त झाले आहेत. मॅट हेनरीचा एमआरआय स्कॅन करण्यात येणार आहे. मॅट हेनरीची दुखापत गंभीरअसल्याचं सांगितलं जात आहे. तर अष्टपैलू खेळाडू जिम्मी नीशमच्याही दुखापतीचं स्कॅन करण्यात आलं आहे. पण नीशमची दुखापत फारशी गंभीर नसल्याचं टीम व्यवस्थापनाने सांगितलं आहे. 

दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी
न्यीझीलंडचा संघाचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनही दुखापतीशी झुंजतोय. रविवारी न्यूझीलंडला पाकिस्तान संघाशी दोन हात करायचे आहेत. या सामन्याविरोधात लॉकी फर्ग्यूसन दुखापतीतून सावरेल असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. मार्क चॅपमेनला अंगठ्याची दुखापत झाली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केन विल्यम्सन आणि मार्क चॅपमेन खेळण्याची शक्यता कमीच आहे. सामन्यापूर्वी विल्यम्सन आणि चॅपमेनची फिटनेस टेस्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंड संघाला प्लेईंग इलेव्हनही निवडणं कठिण बनलंय.

रातोरात घेतला निर्णय
दुखापतग्रस्त खेळाडूंची समस्या पाहता न्यूझीलंड व्यवस्थापनाने रातोरात मोठा निर्णय घेतला आहे. वेगवान गोलंदाज कायले जेमीसनला भारतात बोलवण्यात आलंय. मॅट हेनरीच्या जागी कायले जेमिन्सन प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळताना दिसणार आहे. 

पाकिस्तान की न्यूझीलंड?
पाकिस्तानविरुद्धचा सामना न्यूझीलंडसाठी सेमीफायनलच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. न्यूझीलंडच्या खात्यात सात सामन्यात चार विजयांसह 8 पॉईंट जमा आहेत. तर पाकिस्तानच्या खात्यात सात सामन्यात तीन विजयांसह सहा पॉईंट जमा आहे. पाकिस्तान हा सामना जिंकल्यास त्यांच्या खात्यातही आठ पॉईंट जमा होतील. तर पॉईंटटेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्टेलियाच्या खात्यातही आठ पॉईंट आहेत. त्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी या तीन संघांमध्ये जबरदस्त चुरस असणार आहे.