अबब... पृथ्वीपासून 120000 फुटांवर झेपावली World Cup ची Trophy! ICC चा व्हिडीओ पाहाच

ICC World Cup Trophy 2023 Reached In Space: पुढील काही महिने हा विश्वचषक जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये फिरणार आहे. एकूण 18 देशांमध्ये हा चषक फिरवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 27, 2023, 11:44 AM IST
अबब... पृथ्वीपासून 120000 फुटांवर झेपावली World Cup ची Trophy! ICC चा व्हिडीओ पाहाच title=
हा चषक 18 देशांमध्ये फिरवला जाणार आहे

ICC World Cup Trophy 2023 Reached In Space: आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धांमधील सर्वात मोठी स्पर्धा यंदाच्या वर्षी म्हणजेच 2023 साली खेळवली जाईल अशी घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं म्हणजेच आयसीसीनं केली आहे. खास बाब म्हणजे विश्वचषक स्पर्धेच्या चषकाचं अनावरण अंतराळामध्ये करण्यात आलं. पृथ्वीपासून 1 लाख 20 हजार फूटांवर स्टॅटोस्पीयरपर्यंत हा चषक आकाशात झेपावला. नंतर हा षटक गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमजवळ लॅण्ड झाला.

4 सप्टेंबर रोजी पुन्हा भारतात

जगभरातील क्रिकेटप्रेमी देशांबरोबरच अन्य देशांमध्ये आणि शहरांमध्येही ही स्पर्धा पोहचवण्याचा आयसीसीचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून विश्वचषक स्पर्धेचा चषक जगभरातील अनेक देशांमध्ये फिरवला जाणार आहे. याचं वेळापत्रक आयसीसीने जाहीर केलं आहे. जगभरातील 18 देशांमध्ये विश्वचषक फिरवला जाणार आहे. यामध्ये कुवैत, बहरीन, मलेशिया, अमेरिका, नायझेरिया, युगांडा, फ्रान्स, इटली यासारख्या देशांचाही या 18 देशांमद्ये समावेश आहे. 2019 च्या तुलनेत यंदा हा चषक अधिक देशांमध्ये फिरणार आहे. हा विश्वचषक पुन्हा 4 सप्टेंबर रोजी पुन्हा भारतात दाखल होणार आहे.

हा चषक हातळण्याची संधी

जगभरात हा चषक फिरवला जाण्यासंदर्भात आयसीसीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी जेऑफ अलार्डीस यांनी आपल्या भावना व्यक्त करताना, "या चषकाचा आजपासून प्रवास सुरु होत असून हा फार महत्त्वाचा दिवस आहे कारण ही स्पर्धा आतापर्यंतची सर्वात मोठी आयसीसीची एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ठरणार आहे. हा चषक अनेक देशांचे प्रमुखही हातात घेणार आहेत. तसेच वेगवेगळ्या कम्युनिटी या माध्यमातून जोडल्या जाणार आहेत. याचा फायदा क्रिकेटचा विकास करण्यासाठी आणि त्याला जागतिक स्तरावर अधिक लोकप्रिय करण्यासाठी होणार आहे," असं अलार्डीस यांनी म्हटलं आहे. "विश्वचषकाच्या या जगभ्रमंतीच्या माध्यमातून चाहत्यांना या चषकाला हात लावता येण्याबरोबर तो अधिक जवळून अनुभवता येणार आहे. हा चषक या खेळातील अनेक दिग्गजांनी हाताळला असल्याने तोच चषक हाताळण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे," असंही अलार्डीस म्हणाले आहेत.

"क्रिकेट इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीयांना एकत्र आणणारी दुसरी कोणतीही गोष्ट नाही. आम्ही देशभरामध्ये जगातील 10 सर्वोत्तम संघांना खेळण्याची संधी उपलब्ध करुन देणार आहे. सहा आठवडे ही स्पर्धा खेळवली जाणार आहे," असं बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह यांनी म्हटलं आहे.