ICC World Test Championship Final न्यूझीलंड नशीबवान की योग्यता असलेला संघ?

न्यूझीलंड मधल्या हवामानाच्या आणि खेळपट्टी च्या काठिण्य पातळीवर संघाचे फलनदाज 40 च्या वर सरासरी ठेऊन असतील तर ते श्रेष्ठ मानले पाहिजेत.

Updated: Jun 12, 2021, 03:10 PM IST
ICC World Test Championship Final न्यूझीलंड नशीबवान की योग्यता असलेला संघ?

क्रिकेट समीक्षक रवि पत्की ब्लॉग, मुंबई: न्यूझीलंडचा संघ जागतिक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचला आहे. गंमत म्हणजे दोन वर्षात फक्त 11 कसोटी सामने खेळून तो संघ अंतिम सामन्यात पोहचला आहे. न्यूझीलंड ने 5 मालिका खेळल्या.त्यातल्या 3 घरेलू होत्या आणि दोन बाहेर होत्या. श्रीलंकेतील मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. 

ऑस्ट्रेलियात जाऊन न्यूझीलंडला 0-3 अशी हार पत्करावी लागली. भारताला 2-0,वेस्ट इंडिजला 2-0 आणि पाकिस्तानला 2-0 असे घरच्या मालिकांत हरवून percentage system वर 70%मिळवून संघ अंतिम सामन्यात पोहचला.त्यामुळे खुद्द न्यूझीलंड मधले क्रिकेट तज्ञ समाधानी नाहीत.त्यांच्या मते जागतिक कसोटी स्पर्धा असल्याने न्यूझीलंड ने देशाबाहेर स्वतः ची ताकद दाखवणे आवश्यक होते. 

सर्व conditions मध्ये स्वतः ला सिद्ध केले पाहिजे हा जागतिक अजिंक्यपदाचा निकष आहे.त्यात कोविड मुळे काही मालिका रद्द कराव्या लागल्या.मग प्रश्न असा पडतो की न्यूझीलंड संघ किती योग्यतेचा आहे? आत्ता न्यूझीलंड संघाची रचना,अलीकडची कामगिरी,खेळाडूंचा दर्जा पाहता आपण एक गोष्ट नक्की सांगू शकतो की हा संघ अंतिम सामन्यात स्वतःला उत्कृष्ट सिद्ध केल्या शिवाय राहणार नाही. 

न्यूझीलंड मधल्या हवामानाच्या आणि खेळपट्टी च्या काठिण्य पातळीवर संघाचे फलनदाज 40 च्या वर सरासरी ठेऊन असतील तर ते श्रेष्ठ मानले पाहिजेत. न्यूझीलंड संघातल्या पहिल्या सहापैकी बहुतेकांची सरासरी 40 च्या वर आहे.विलीअमसन, निकोल्स, लेथम, टेलर सगळे 40 च्या वर आहेतच.विलीअमसन तर 53 ची सरासरी बाळगून आहे.इंग्लंडमधल्या कंडिशन्स न्यूझीलंडच्या जवळच्या असल्याने त्यांचे फलनदाज अंतिम सामन्यात लवकर जुळवून घेतील. 

न्यूझीलंडमध्ये कुकाबुरा चेंडू तर भारतात एसजी चेंडू वापरला जातो.त्यामुळे तटस्थेकरता अंतिम सामन्यात ड्युक चा चेंडू वापरला जाणारा आहे जो ऐअरफोर्सच्या विमानासारखा हवेत कसाही दिशा बदलतो. इंग्लिश हवामान आणि ड्युक चेंडूचा पुरेपूर उपयोग करून घेतील असे बोल्ट, साउदी, जेमिसन,हेनरी असे एकापेक्षा एक गोलनदाज भारतीय फ्लनदाजांची कसोटी पहाणार आहेत. 

सामन्याचा निकाल भारतीय फ्लनदाजांच्या कामगिरीवर अवलंबून राहील. स्विंगचा सामना निग्रहाने करून भारतीय फ्लनदाजानी 350 ते 400 चा स्कोर केला पाहिजे.मग भारतीय गोलनदाजी न्यूझीलंडला निश्चित रोखू शकेल. घोडा मैदान जवळच आहे.