चेन्नई : मंगळवारी हैदराबादविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये चेन्नईचा ६ विकेटने विजय झाला. या विजयाबरोबरच चेन्नई पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. तसंच चेन्नईचं प्ले ऑफमधलं स्थानही जवळपास निश्चित झालं आहे. चेन्नईने आत्तापर्यंत खेळलेल्या ११ मॅचपैकी ८ मॅच जिंकल्या आणि ३ मॅच गमावल्या आहेत. यामुळे त्यांच्या खात्यात १६ पॉईंट्स आहेत.
या मॅचनंतर क्रिकेट समाचोलक हर्षा भोगले यांनी धोनीला चेन्नईच्या प्रत्येक वर्षी प्ले ऑफमध्ये क्वालिफाय व्हायचं रहस्य विचारलं. त्यावर धोनीने त्याच्या खास शैलीत उत्तर दिलं. 'या गोष्टी मी प्रत्येकाला सांगितल्या, तर कोणीही मला लिलावात विकत घेणार नाही', असं धोनी म्हणाला.
हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये शेन वॉटसनने ९६ रनची खेळी केली. या मॅचआधी वॉटसन खराब फॉर्ममध्ये होता, तरी चेन्नईच्या टीमने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि वॉटसननेही हा विश्वास सार्थ ठरवला. 'वॉटसन हा महान खेळाडू आहे. त्याने नेहमीच टीमला जिंकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वॉटसन आमच्यासाठी मॅच विनर आहे. तो फॉर्ममध्ये नसला तरी त्याला जास्तीत जास्त संधी द्यायचा निर्णय आम्ही घेतला होता. यामुळे त्याच्यामध्ये आत्मविश्वास आला', अशी प्रतिक्रिया धोनीने दिली.
'आमची बॉलिंग योग्य होत आहे, बॅटिंगही अशाच प्रकारे व्हावी, अशी माझी अपेक्षा आहे. यामुळे पुढच्या मॅचमध्ये खेळणं सोपं होईल. टीमच्या आत्तापर्यंतच्या विजयामध्ये सगळ्या खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रत्येक मॅचमध्ये वेगळा खेळाडू मॅच जिंकवून देतोय, ही गोष्ट चांगली आहे,' असं वक्तव्य धोनीने केलं.
'टीमच्या विजयामध्ये लोकांचं, सपोर्ट स्टाफचं आणि फ्रेंचायजीचं योगदानही मोलाचं असतं. टीमच्या विजयामध्ये प्रत्येक छोट्या छोट्या व्यक्ती योगदान देतात. मी काही दिवसांमध्ये निवृत्त होईन, यामुळे आणखी खुलासे करु शकत नाही कारण वर्ल्ड कप जवळ आहे आणि मला याची काळजी घ्यावी लागेल', असं सूचक विधान धोनीने केलं.