IND vs PAK: न्यूयॉर्कच्या खराब खेळपट्टीमुळे रोहित शर्माला टेन्शन, पाकिस्तानविरुद्ध कसा असेल 'गेमप्लॅन', म्हणतो...

India vs Pakistan New York Pitch Report : न्यूयॉर्कच्या खराब खेळपट्टीमुळे पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचे दोन फलंदाज जखमी झाले होते. त्यामुळे आता पाकिस्ताविरुद्ध टीम इंडिया कशी जिंकणार? असा सवाल विचारला जातोय.

सौरभ तळेकर | Updated: Jun 6, 2024, 07:15 PM IST
IND vs PAK: न्यूयॉर्कच्या खराब खेळपट्टीमुळे रोहित शर्माला टेन्शन, पाकिस्तानविरुद्ध कसा असेल 'गेमप्लॅन', म्हणतो... title=
Rohit Sharma on India vs Pakistan Match

India vs Pakistan New York Pitch Report : आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने 8 विकेट्सने विजय मिळवला. आयर्लंडने प्रथम फलंदाजी केली. प्रथम खेळताना आयर्लंडने 16 षटकांत 96 धावा केल्या होत्या, त्यानंतर भारताने 12.2 षटकांत 2 गडी गमावून लक्ष्य गाठलं सोपं गेलं. परंतू न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणं भारतीय फलंदाजांसाठी खूप कठीण काम होतं. याची झलक पहिल्याच सामन्यात पहायला मिळाली. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ऋषभ पंत दोन्ही खेळाडू फलंदाजीवेळी जखमी झाले होते. अशातच आता कॅप्टन रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्ध (IND vs PAK) गेमप्लॅन सेट केला आहे.

न्यूयॉर्कमधील पिच पाहता टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध संभाळून खेळावं लागणार आहे. पाकिस्तानचे गोलंदाज शाहीन अफरीदी, मोहम्मद आमिर, नसीम शाह यांच्या भेदक माऱ्याला न्यूयॉर्कच्या नव्या खेळपट्टीवर टीम इंडियाचे फलंदाज कसा प्रतिसाद देणार? यावर सध्या चर्चा होताना दिसतेय. अशातच आता रोहित शर्माने यावर वक्तव्य केलंय. पाकिस्तानविरुद्धचा सामना नेहमी आव्हानात्मक असतो. त्यामुळे आम्ही संघिक पद्धतीने खेळू, असं रोहित शर्माने म्हटलं आहे.

आयर्लंडविरुद्ध आम्ही चार सीमरची खेळपट्टी होती पण तरीही आम्ही दोन फिरकीपटूंसह खेळलो, खरं सांगायचं तर खेळपट्टीकडून काय अपेक्षा करावी हे मला कळत नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी आम्ही परिस्थितीनुसार तयारी करत आहोत. मोठ्या सामन्यात सर्व खेळाडूंना योगदान द्यावं लागणार आहे. खेळपट्टीवर थोडा वेळ घालवणं चांगलं ठरू शकतं. खेळपट्टीवर वेळ घालवून तुम्ही तुमची फलंदाजी सुधारू शकता, असंही रोहित शर्माने म्हटलं आहे.

रोहित शर्मा जायबंदी

रोहित शर्माने आयर्लंडविरुद्ध खेळताना 36 चेंडूत आपल्या टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 30 वं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र, ओव्हर संपताच तो फिजिओसोबत मैदानाबाहेर गेला. आधीच्या ओव्हरमध्ये एक बॉल रोहितच्या उजव्या हातावर बसला. त्यामुळे त्याला फिजिओची मदत घ्यावी लागली. मात्र, मैदानात उपचार केल्यानंतर देखील रोहित शर्माने मैदान सोडलं. त्यामुळे सर्वांनाच धडकी भरली. रोहित शर्मा रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर सूर्यकुमार मैदानात आला होता. मात्र, रोहितची दुखापत गंभीर नसल्याची माहिती समोर आली आहे.