IND vs SL 3rd ODI : तिसऱ्या सामन्यात पाऊस घालणार खोडा? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

India vs Sri Lanka 3rd ODI :  भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यावर पावसाचं सावट (Weather Forecast) आहे का? जाणून घ्या रिपोर्ट

सौरभ तळेकर | Updated: Aug 6, 2024, 09:21 PM IST
IND vs SL 3rd ODI : तिसऱ्या सामन्यात पाऊस घालणार खोडा? जाणून घ्या हवामानाचा अंदाज title=
India vs Sri Lanka 3rd ODI Colombo Weather Forecast

IND vs SL Colombo Weather Forecast : भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात 32 धावांनी पराभव झाल्याने आता टीम इंडियाला तिसरा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. टीम इंडियाला सिरीज बरोबरीत सोडवायची असेल तर अखेरचा सामना महत्त्वाचा असणार आहे. पहिला सामना टाय झाल्याने मालिका विजयासाठी दोन्ही सामने जिंकणे गरजेचे होते. मात्र, श्रीलंकेने दुसरा सामना जिंकल्याने आता मालिका बरोबरीत सोडवणं सर्वात मोठं आव्हान असेल. अशातच आता सामन्यात पाऊस खोडा घालणार का? असा सवाल विचारला जात आहे.

कसं असेल हवामान?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील निर्णायक सामन्यादरम्यान कोलंबोमध्ये ढगाळ वातावरण असेल, अशी माहिती समोर आली आहे. सामन्यात 18 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामन्याच्या वेळी कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसपर्यंत असेल. तर रात्रीच्या वेळी 26 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहू शकतं. तसेच आर्द्रतेची पातळी 80 ते 87 टक्के असेल, अशी माहिती देखील समोर आली आहे.

पीच रिपोर्ट

पहिल्या दोन सामन्याप्रमाणे या सामन्यात देखील टॉस महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. जॉस जिंकणारी टीम प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकते. तर 260 धावांचं आव्हान माफक असेल. तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 

हेड टू हेड

भारत आणि श्रीलंका वनडेमध्ये तब्बल 170 वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये टीम इंडियाचं पारडं भारी राहिलंय. भारताने 99 सामन्यात विजय मिळवला असून आता विजयाचं शतक ठोकण्याची संधी भारताकडे आहे. तर 58 सामन्यात श्रीलंकेने बाजी मारली आहे. तसेच 2 सामने बरोबरीत सुटले. त्याचबरोबर 11 सामन्यांचा निकाल लागला नव्हता. श्रीलंकेमध्ये झालेल्या 68 सामन्यात भारताने 32 तर श्रीलंकेने 29 सामन्यात विजय संपादन केलाय.

टीम इंडिया (संभाव्य प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

श्रीलंका (संभाव्य प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चरिथ असालंका (कर्णधार), कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, अकिला दानंजया, असिथा फर्नांडो, जेफ्री वेंडरसे.