IND vs SL Hardik Pandya Press Conference : टीम इंडिया उद्या 3 जानेवारी मंगळवारपासून हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली श्रीलंकेविरूद्ध 3 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेपुर्वी हार्दिक पंड्याची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेत त्याने या वर्ल्ड कप आणि ऋषभ पंतबाबत (Rishabh Pant) मोठं विधान केले आहे. नेमकं या पत्रकार परिषदेत तो काय म्हणालाय, ते जाणून घेऊयात.
टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंडया (Hardik Pandya) याला पत्रकार परीषेदत वर्ल्ड कपशी संबंधित प्रश्नही विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना पंड्या म्हणाला, टीम इंडियाने (Team India) नव्या वर्षात विश्वचषक जिंकण्याचा संकल्प केला आहे.आमचा उद्देश आपल्या देशासाठी विश्वचषक जिंकणे आहे. दुर्दैवाने, आम्ही 2022 मध्ये ते करू शकलो नाही, परंतु आम्हाला यावर्षी ते अधिक चांगले करायचे आहे, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.
'मला एकच भाषा येते, ती म्हणजे मेहनत. दुखापत माझ्या हातात नाही, पण माझा या प्रक्रियेवर विश्वास आहे. 2022 हे वैयक्तिकरित्या माझ्यासाठी सर्वोत्तम वर्ष होते, असे हार्दिक पंड्या (Hardik Pandya) त्याच्या गोलंदाजीवर म्हणाला आहे. तसेच तो पुढे म्हणाला की, आम्ही वर्ल्ड कप जिंकलो नाही, पण हा खेळाचा भाग आहे. संघाला अनेक देशांतील स्पर्धा जिंकण्यास मदत करणे हा माझा उद्देश असल्याचेही तो पुढे म्हणतो.
हार्दिक पंडयाला (Hardik Pandya) कसोटी संबंधितही प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तो म्हणाला की, “आता मला मर्यादित षटकांमध्ये पूर्णपणे खेळू द्या. त्यानंतर मी कसोटी क्रिकेटचा विचार करेन. या त्याच्या विधानानंतर स्पष्ट होते की, त्याने कसोटी क्रिकेट पूर्णपणे सोडलेले नाही आणि भविष्यात तो सर्वात लांब फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे.
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच हार्दिकने ऋषभ पंतशी (Rishabh Pant) संबंधित प्रश्नाचे उत्तर दिले. तो म्हणाला, ऋषभ पंत सोबत जे घडले ते दुर्दैवी होते. आमचे प्रेम, आमच्या प्रार्थना त्याच्या पाठीशी असल्याचे हार्दिक पंड्या म्हणालाय. तसेच तो संघासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. आम्हाला पुढील मूल्यमापन करणे आवश्यक आहे. त्याच्या अनुपस्थितीत इतरांना संधी मिळेल. संघातील त्याच्या अनुपस्थितीने मोठा फरक पडेल, असे देखील हार्दिक पंड्या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देता म्हणालाय.
दरम्यान भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध (India vs sri lanka) तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 3 जानेवारीला होणार आहे. या मालिकेत हार्दिक पंड्या (Hardik Pandya) टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. या सामन्याची भारतीय क्रिकेट फॅन्सना उत्सुकता लागलीय.