भारताचा पराभव! सर्वात मोठा गुन्हेगार कोण? कर्णधार पंड्याने एका ओळीत दिलं उत्तर, म्हणाला...

IND vs WI 2nd T20I Hardik Pandya On Loss: सलग दुसऱ्या सामन्यामध्ये वेस्ट इंडीजच्या संघाने भारतीय संघाला पराभूत केलं आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाला धावांचा पाठलाग जमला नाही आणि दुसऱ्या सामन्यात भारताला धावांचा पाठलाग करणाऱ्या वेस्ट इंडीजच्या संघाला रोखण्यात अपयश आलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 7, 2023, 08:51 AM IST
भारताचा पराभव! सर्वात मोठा गुन्हेगार कोण? कर्णधार पंड्याने एका ओळीत दिलं उत्तर, म्हणाला... title=
सामन्यानंतर बोलताना हार्दिक पंड्याने व्यक्त केलं मत

IND vs WI 2nd T20I Hardik Pandya On Loss: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 150 धावांचं लक्ष गाठता आलं नव्हतं आणि दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला 153 धावांचा पाठलाग करणाऱ्या यजमान संघाला रोखता आलं नाही. त्यामुळेच वेस्ट इंडीजच्या संघाने 5 सामन्यांच्या टी-20 सामन्यामध्ये 2-0 ने आघाडी मिळवली आहे. गुयानामधील प्रोविडेन्स स्टेडियममध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 

दुसऱ्या सामन्यात घडलं काय?

दुसऱ्या टी-20 सामन्यामध्येही भारतीय सलामीवीर अपयशी झाल्याचं पहायला मिळालं. तिलक वर्मा (51 धावा) आणि हार्दिक पंड्या (24 धावा) या दोघांच्या कामगिरीच्या जोरावर भारताला 20 ओव्हरमध्ये 7 बाद 152 धावांपर्यंत मजल मारता आली. वेस्ट इंडीजने हे लक्ष्य 7 चेंडू शिल्लक असतानाच गाठलं. धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजच्या संघाची अवस्था एका वेळेस 129 धावांवर 8 गडी बाद अशी होती. तळाच्या फलंदाजांचा भारतीय गोलंदाजांसमोर काही निभाव लागणार नाही आणि सामना भारत सहज जिंकेल असं वाटत होतं. 24 चेंडूंमध्ये 24 धावांची वेस्ट इंडीजला गरज होती. त्यावेळी 10 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला अल्जारी जोसेफने अकील हुसैनच्या मदतीने 26 धावांची पार्टनरशीप केली. या दोघांनी यजमान संघाला 2 गडी राखून विजय मिळवून दिला. दोघींनी 17 चेंडूंमध्येच 26 धावा करत 18.5 ओव्हरमध्येच संघाला विजय मिळवून दिला.

पराभवाला जबाबदार कोण? पंड्या म्हणाला..

मात्र या सामन्यातील पराभवासाठी कर्णधार हार्दिक पंड्याने फलंदाजांना दोषी ठरवत भारतीय फलंदाजीवर खापर फोडलं आहे. भारताच्या या पराभवासाठी जबाबदार कोण किंवा या सामन्यातील अपयशासाठी गुन्हेगार कोण? असं पंड्याला सामन्यानंतरच्या मुलाखतीत विचारण्यात आलं. पंड्याने या प्रश्नाला अगदी एका ओळीत उत्तर दिलं. "आमची फलंदाजी चांगली झाली नाही," असं पंड्या म्हणाला. तसेच सामन्यातील कामगिरीचं विश्लेषण करताना, "आमचे खेळाडू बाद होत राहिले आणि खेळपट्टी संथ होती. आम्ही 160 हून अधिक धावांपर्यंत पोहोचू शकलो असतो. ज्या पद्धतीने पूरन फलंदाजी करत आहे ते पाहता फिरकी गोलंदाजांना योग्य पद्धतीने वापरणं कठीण होतं. तुम्ही अशावेळी गोलंदाजी करताना चेंडू पूरनपासून दूर टाकला की जवळ याचा त्याला विशेष काही फरक पडत नाही. त्यांनी (वेस्ट इंडीजने) 2 धावांवर 2 गडी तंबूत परतल्यानंतर जशी फलंदाजी केली ती खरोखरच अविश्वसनीय आहे," असं मत कर्णधार पंड्याने नोंदवलं.

नक्की वाचा >> लाज काढली! भारतीय सलामीवीरांपेक्षा अधिक धावा वेस्ट इंडिजच्या 10 व्या क्रमांकाच्या खेळाडूंनी केल्या; पाहा आकडेवारी

तळाची फलंदाजी सुधारण्याची गरज

तळाच्या खेळाडूंची फलंदाजी आणि रवि बिश्नोईला 8 व्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यासंदर्भात बोलताना पंड्याने, "आमच्याकडे सध्या जे कॉम्बिनेशन उपलब्ध आहे त्यानुसार 7 फलंदाजांना घेऊन आम्हाला खेळावं लागतं. गोलंदाज सामने जिंकवत नाही असं नाही. आम्हाला आता 8,9 आणि 10 व्या क्रमांकावरील फंलदाजी अधिक सक्षम कशी करता येईल याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे," असंही सांगितलं. 

यजमानांची भन्नाट कामगिरी

एकीकडे भारताचे तळाचे फलंदाज अपयशी ठरत असतानाच दुसरीकडे यजमान संघाचे तळाचे म्हणजेच 9 व्या, 10 व्या क्रमांकावरील फलंदाज सामने जिंकवून देण्यात मोलाची कामगिरी करत आहेत.