Ind vs WI Number 10 Batsman Scores More Than Indian Openers: रोवमॅन पॉवलेच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडीजच्या संघाने दुसऱ्या टी-20 सामन्यामध्येही भारतीय संघाला पराभूत केलं आहे. या विजयासहीत यजमान संघाने 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ची आघाडी घेतली आहे. गयानामध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 7 विकेट्सच्या मोबदल्यात 152 धावा केल्या. तिलक वर्माने 41 चेंडूंमध्ये 51 धावा केल्या.
धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजच्या संघाची अवस्था एका वेळेस 129 धावांवर 8 गडी बाद अशी होती. तळाच्या फलंदाजांचा भारतीय गोलंदाजांसमोर काही निभाव लागणार नाही आणि सामना भारत सहज जिंकेल असं वाटत होतं. 24 चेंडूंमध्ये 24 धावांची वेस्ट इंडीजला गरज होती. त्यावेळी 10 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला अल्जारी जोसेफने अकील हुसैनच्या मदतीने 26 धावांची पार्टनरशीप केली. या दोघांनी यजमान संघाला 2 गडी राखून विजय मिळवून दिला. दोघींनी 17 चेंडूंमध्येच 26 धावा करत 18.5 ओव्हरमध्येच संघाला विजय मिळवून दिला. यापूर्वी निकोलस पूरनने 40 चेंडूंमध्ये 67 धावांची खेळी केली. 6 चौकार आणि 4 षटकार पूरनने लगावले. पूरनला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिल सलग दुसऱ्या टी-20 मध्ये अपयशी ठरला. त्याने 9 चेंडूंमध्ये 7 धावा केल्या. अल्जारी जोसेफच्या वेगवान चेंडूवर गिल तंबूत परतला. सूर्यकुमार यादवने 3 चेंडूंमध्ये 1 धाव करुन बाद झाला. दुसरीकडे संजू सॅमसनने 7 चेंडूंमध्ये 7 धावा केल्या आणि फिरकीपटू अकली हुसैनच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. दुसरीकडे वेस्ट इंडीजच्या 10 व्या क्रमांकाचा फलंदाज अल्जारी जोसेफने या तिन्ही भारतीय सलामीवीरांहून अधिक धावा केल्या जोसेफने 8 चेंडूंमध्ये 10 धावा केल्या आणि तो नाबाद राहिला. त्याने 19 व्या ओव्हरमध्ये वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला उत्तुंग षटकारही लगावला. तर दुसरीकडे अकील हुसैनने 10 चेंडूंमध्ये 16 धावा केल्या आणि तो नाबाद राहिला. त्याने 2 चौकार लगावले. यापूर्वी 1-0 ने आघाडीवर असलेल्या वेस्ट इंडीजच्या संघाने 2-0 ची आघाडी मिळवली.
20 वर्षीय तिलक वर्माने या मालिकेपासून टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पदार्पण केलं आहे. त्याने पहिल्या टी-20 मध्ये 39 धावा केल्या तर दुसऱ्या सामन्यात 51 धावा केल्या. म्हणजेच त्याने 2 चेंडूंमध्ये 90 धावा केल्या. अन्य भारतीय फलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर इतर कोणालाही 50 धावांपर्यंत मजल मारता आली नाही. यावरुन भारतीय फलंदाजांच्या कामगिरीचा अंदाज बांधचा येतो. पंड्याने 2 सामन्यांमध्ये 43, ईशान किशनने 2 सामन्यांत 33, सूर्यकुमार यादवने 2 सामन्यांत 22 आणि शुभमन गिलने 2 सामन्यांत 10 धावा केल्या. दुसरीकडे भारतीय संघातील तळाचे फलंदाज अर्शदीप सिंगने 2 सामन्यात 18 आणि अक्षर पटेलने 2 सामन्यात 27 धावा केल्या. संजू सॅमसनलाही फारशी चमक दाखवता आलेली नसून त्याने 2 सामन्यात 19 धावा केल्या आहेत.
भारत आणि वेस्ट इंडीजदरम्यानच्या या मालिकेमधील तिसरा सामना 8 ऑगस्ट रोजी गयानामध्ये खेळवला जाणार असून अंतिम 2 सामने अमेरिकेत खेळवले जाणार आहेत.