या एकाच देशात भारताला अजूनही टेस्ट सीरिज जिंकता आली नाही

ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय झाला.

श्रेयस देशपांडे | Updated: Jan 8, 2019, 07:17 PM IST
या एकाच देशात भारताला अजूनही टेस्ट सीरिज जिंकता आली नाही title=

सिडनी : ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय झाला. ७१ वर्षातला भारताचा ऑस्ट्रेलियातला हा पहिलाच टेस्ट सीरिज विजय आहे. तसंच ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकणारा भारत हा पहिलाच आशियाई देश ठरला आहे. ही सीरिज जिंकल्यानंतर आता भारताला टेस्ट खेळणाऱ्या फक्त एकाच देशात टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. त्या देशाचं नाव आहे दक्षिण आफ्रिका. भारतानं आत्तापर्यंत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज या देशांमध्ये टेस्ट सीरिज जिंकली आहे. अफगाणिस्तान आणि आयर्लंड या देशांना आयसीसीनं नुकताच टेस्ट दर्जा दिला आहे, पण या दोन्ही देशांमध्ये भारताच्या मॅच न झाल्यामुळे या दोन्ही देशांना या यादीत ग्राह्य धरण्यात आलेलं नाही.

दक्षिण आफ्रिकेत भारताची कामगिरी

दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतानं आत्तापर्यंत ७ टेस्ट सीरिज खेळल्या आहेत. यातल्या एकाही सीरिजमध्ये भारताला विजय मिळवता आलेला नाही. २०१०-११ सालची ३ टेस्ट मॅचची सीरिज १-१नं ड्रॉ करण्यामध्ये भारताला यश आलं होतं. तर दक्षिण आफ्रिकेत झालेल्या ६ टेस्ट सीरिजमध्ये भारताचा पराभव झाला आहे.

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियामध्ये भारतानं आत्तापर्यंत १२ टेस्ट सीरिज खेळल्या आहेत. यातल्या आत्ता झालेल्या सीरिजमध्ये भारताला पहिल्यांदाच विजय मिळाला. यातली २००३-०४ सालची सीरिज ड्रॉ करण्यात भारताला यश आलं. ही सीरिज वगळता ऑस्ट्रेलियातल्या इतर सगळ्या सीरिजमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला होता.

न्यूझीलंड

न्यूझीलंडमध्ये भारतानं आत्तापर्यंत ९ टेस्ट सीरिज खेळल्या आहेत. यातल्या २ सीरिजमध्ये भारताला विजय मिळाला, तर ५ सीरिजमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला. भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यातला २ सीरिज या ड्रॉ झाल्या.

इंग्लंड

भारतानं आत्तापर्यंत इंग्लंडचे १८ दौरे केले आहेत. यातल्या ३ वेळा १९७१ साली, १९८६ साली आणि २००७ साली भारतानं इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकली. तर २००२ सालची एकमेव सीरिज ड्रॉ करण्यात भारताला यश आलं. उरलेल्या १४ सीरिजमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला.

वेस्ट इंडिज

वेस्ट इंडिजमध्ये भारतानं आत्तापर्यंत ११ टेस्ट सीरिज खेळल्या आहेत. यातल्या ४ सीरिजमध्ये भारताचा विजय झाला, तर ७ सीरिजमध्ये भारताचा पराभव झाला.

झिम्बाब्वे

भारतानं आत्तापर्यंत ४ वेळा झिम्बाब्वेमध्ये टेस्ट सीरिज खेळली आहे. यातल्या २००५ साली झालेल्या सीरिजमध्ये भारताचा विजय झाला. तर २ सीरिज ड्रॉ झाल्या आणि एका सीरिजमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला. २००५ सालानंतर भारतानं झिम्बाब्वेमध्ये एकही टेस्ट सीरिज खेळली नाही.

पाकिस्तान

पाकिस्तानमध्ये भारतानं आत्तापर्यंत ७ टेस्ट सीरिज खेळल्या आहेत. यातली २००३-०४ सालच्या एकमेव सीरिजमध्ये भारताचा विजय झाला. तर ३ सीरिज पाकिस्ताननं जिंकल्या आणि ३ सीरिज ड्रॉ झाल्या.

श्रीलंका

भारतानं श्रीलंकेमध्ये आत्तापर्यंत ८ टेस्ट सीरिज खेळल्या आहेत. यातल्या ३ सीरिजमध्ये भारताचा विजय झाला, तर ३ सीरिज भारताला गमवाव्या लागल्या आणि २ टेस्ट सीरिज ड्रॉ झाल्या.

बांगलादेश

बांगलादेशमध्ये भारतानं आत्तापर्यंत ५ टेस्ट सीरिज खेळल्या, यातल्या ४ सीरिजमध्ये भारताचा विजय झाला तर १ सीरिज ड्रॉ झाली. भारतानं बांगलादेशमध्ये अजून एकही सीरिज गमावलेली नाही.