टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव; वनडे सीरिजही गमावली

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचमध्येही भारताचा पराभव झाला आहे. 

Updated: Feb 8, 2020, 04:19 PM IST
टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव; वनडे सीरिजही गमावली title=

ऑकलंड : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचमध्येही भारताचा पराभव झाला आहे. या पराभवामुळे भारताने वनडे सीरिज गमावली आहे. न्यूझीलंडने ठेवलेल्या २७४ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा २५१ रनवर ऑलआऊट झाला, त्यामुळे भारताने हा सामना २२ रनने गमावला. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. तळाला बॅटिंगला आलेल्या रवींद्र जडेजा आणि नवदीप सैनीने भारताला २५१ पर्यंत पोहोचवलं.

न्यूझीलंडच्या बॉलरनी भारताला सुरुवातीलाच धक्के दिले. पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे भारताची बॅटिंग कोसळली. १२९ रनवर भारताचे ६ बॅट्समन माघारी परतले होते. रवींद्र जडेजाने पहिले शार्दुल ठाकूर आणि मग नवदीप सैनीला हाताशी धरून भारताचा दारूण पराभव टाळला. जडेजाने ७३ बॉलमध्ये ५३ रन केले. तर नवदीप सैनीने ४९ बॉलमध्ये ४५ रन आणि शार्दुल ठाकूरने १५ बॉलमध्ये १८ रनची खेळी केली.

पहिल्या मॅचमध्ये शतक करणाऱ्या श्रेयस अय्यरने या मॅचमध्ये ५२ रन केले. न्यूझीलंडकडून हामीश बेनेट, टीम साऊदी, काईल जेमीसन, कॉलीन डि ग्रॅण्डहोम यांना प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. जीमी निशमला १ विकेट घेण्यात यश आलं.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. या मॅचमध्येही मार्टीन गप्टील आणि हेन्री निकल्सने न्यूझीलंडला ९३ रनची ओपनिंग पार्टनरशीप करुन दिली. मार्टीन गप्टीलने सर्वाधिक ७९ रन केले. मागच्या मॅचमध्ये शतक करणारा रॉस टेलर ७३ रनवर नाबाद राहिला. न्यूझीलंडने ५० ओव्हरमध्ये ८ विकेट गमावून २७३ रन केले.

भारताकडून युझवेंद्र चहलने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या, तर शार्दुल ठाकूरला २ विकेट मिळाल्या आणि रवींद्र जडेजाला १ विकेट घेता आली. टीम इंडियाची न्यूझीलंडविरुद्ध वनडेमध्ये पराभवाची हॅट्रिक झाली आहे. सीरिजची पहिली वनडे गमावण्याआधी भारताचा वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्येही न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. या सीरिजची तिसरी आणि शेवटची मॅच ११ फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. वनडे सीरिजनंतर दोन्ही टीममध्ये २ टेस्ट मॅचची सीरिज होईल.