गंभीरला फायनल ऑफर! टीम इंडियाला मिळणार Stop-Gap Bowling Coach; वाद सोडवण्याचा BCCI चा प्रयत्न

BCCI Offers To Gautam Gambhir: भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून श्रीलंकेचा दौरा हा गंभीरचा पहिला औपचारिक दौरा असणार आहे. यापूर्वीच बीसीसीआयने त्याच्याबरोबर असलेल्या मतभेदावरुन त्याला एक हटके ऑफर देऊ केली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 20, 2024, 03:52 PM IST
गंभीरला फायनल ऑफर! टीम इंडियाला मिळणार Stop-Gap Bowling Coach; वाद सोडवण्याचा BCCI चा प्रयत्न title=
बीसीसीआयचा मतभेदावर तोडगा काढण्याचा प्रयत्न

BCCI Offers To Gautam Gambhir: गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा पुढील पाच वर्षांसाठी संभाळेल, अशी घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी 9 जुलै रोजीच केली. राहुल द्रविडचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ टी-20 वर्ल्ड कप 2024 नंतर संपुष्टात आल्यानंतर त्याच्या जागी गंभीरची वर्णी लागली आहे. भारतीय संघाचा प्रशिक्षक गंभीरच्या स्वरुपात निश्चित झाला असला तरी सहाय्यक प्रशिक्षक निश्चित झालेले नाहीत. गंभीरला त्याच्या इच्छेप्रमाणे सहाय्यक प्रशिक्षक निवडण्याची भूमिका देण्यात आली. मात्र बीसीसीआयने गंभीरने समोर ठेवलेल्या नावांपैकी अनेक नावं फेटाळली आहेत. जय शाहांबरोबरच बीसीसीआयचा गंभीरने सुचवलेल्या अनेक नावांना विरोध असल्याचं समजतं. असं असतानाच आता बीसीसीआयने अवघ्या काही दिवसांवर आलेल्या श्रीलंका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या मतभेदावर स्टॉप-गॅप कोचच्या माध्यमातून उतारा दिला आहे.

कशी आहे श्रीलंका मालिका?

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर 3 टी-20 सामने आणि 3 एकदिवसीय समाने खेळणार आहे. टी-20 सामन्यांचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे. हार्दिक पंड्याला धोबीपछाड देत रोहित शर्मानंतर टी-20 चं नेतृत्व सूर्यकुमाने पटकावलं आहे. 27 जुलै रोजी श्रीलंकेली पाल्लेकल येथे होणाऱ्या सामन्यापासून गंभीर भारताचा प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. तर पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ एकदिवीसीय मालिका खेळणार आहे. ही मालिका 3 ते 7 ऑगस्ट दरम्यान खेळवली जाणार आहे. 

गंभीरची पसंत, बीसीसीआयचा नकार

श्रीलंकेच्या दौऱ्याआधी गौतम गंभीर सहाय्यक प्रशिक्षक निवडेल अशी अपेक्षा होती. मात्र 22 जुलै रोजी श्रीलंकेला भारतीय संघ रवाना होणार असून आता या दौऱ्यावर गंभीरबरोबर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील प्रशिक्षक जातील असं सांगितलं जात आहे. गंभीरने बीसीसीआयकडे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून तब्बल पाच नावं सुवली होती. मात्र बीसीसीआयने अभिषेक नायर हे एकमेव नाव वगळता सर्व नावं फेटाळली आहेत. अभिषेक नायरची नियुक्ती फलंदाजीचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून होऊ शकते. मात्र आता गोलंदाजीचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून बीसीसीआयने गंभीरसमोर एक वेगळाच पर्याय ठेवला आहे.

नक्की वाचा >> 'मी अजून काय करणं अपेक्षित आहे? मी कधीच...', कोहलीवर भडकला मोहम्मद शमी; म्हणाला, 'तुम्ही मला..'

बीसीसीआयने दिली ही ऑफर

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील प्रशिक्षक ट्रॉय कूली यांची स्टॉप-गॅप बोलिंग कोच म्हणून मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी नियुक्ती करण्यास बीसीसीआय तयार आहे. स्टॉप-गॅप पद्धत म्हणजे अधिक उत्तम पर्याय सापडेपर्यंत आहे त्या गोष्टीचा सदुपयोग करुन घेणे. म्हणजेच गोलांदाजीच्या सहाय्यक पदावर गंभीर आणि बीसीसीआयचं एकमत होईल अशी व्यक्ती सापडेपर्यंत किंवा निश्चित होईपर्यंत ट्रॉय कूली यांच्या अनुभवाचा आणि प्रशिक्षणाचा वापर गंभीरने संघाच्या भल्यासाठी करुन घ्यावा असा बीसीसीआयचा प्रस्ताव आहे. श्रीलंकेच्या दौऱ्याआधी बीसीसीआयकडून ही गंभीरसाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून फायनल ऑफर मानली जात आहे.

नक्की वाचा >> 'आमच्यातील वादाचा परिणाम...'; गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर विराटने BCCI ला स्पष्ट शब्दात सांगितलं

भारताचा दुसरा दौरा

भारतीय संघ 22 जुलै रोजी श्रीलंकेला रवाना होणार आहे. त्यापूर्वी सोमवारी बीसीसीआयचे पत्रकार परिषद होणार आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर हा भारताचा दुसरा टी-20 दौरा असणार आहे. नुकताच भारतीय संघाने झिम्बाव्वेविरुद्धच्या 5 सामन्यांची मालिका 4-1 ने जिंकली आहे. या मालिकेत संघाचं नेतृत्व शुभमन गिलने केला. मात्र या मालिकेत भारताचे कोणतेच पहिल्या फळीतील स्टार खेळाडू नव्हते.