Virat Kohli Clear Message To BCCI: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी 9 जुलै रोजी गौतम गंभीर पुढील पाच वर्षांसाठी भारतीय संघाचा प्रशिक्षक असेल असं जाहीर केलं. या घोषणेनंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात सर्वात पहिली व्यक्ती आली ती म्हणजे विराट कोहली! गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर कोहलीचं काय होणार याबद्दल क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु आहे. विराट आणि गंभीरमधील वाद हा जगजाहीर आहे. अनेकदा हे दोघे आमने-सामने आले असून आयपीएलमधील एका सामन्यात तर दोघांमध्ये बाचाबाचीही झाली होती.
द्रविड भारताचा प्रशिक्षक म्हणून पायउतार झाल्यानंतर गंभीर प्रशिक्षक बनणार हे स्पष्ट होतं. इंडियन प्रिमिअर लीगमध्ये मागील काही वर्षांमध्ये गंभीरने मेंटॉर म्हणून संघांना केलेलं मार्गदर्शन आणि त्याचा परिणाम समोर आल्यानंतर गंभीरकडेच ही जबाबदारी जाणार हे अधिक उघड होतं. आता गंभीर प्रशिक्षक म्हणून पहिलीच मालिका श्रीलंकेत खेळवली जाणार असून या मालिकेसाठी विराट कोहलीनेही गंभीरच्या विनंतीवर आपण खेळण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे पहिल्यांदाच हे दोघे प्रशिक्षक आणि खेळाडू म्हणून मैदानात एकत्र दिसणार आहेत.
विराट आणि गंभीर पहिल्यांदाच नव्या भूमिकेत एकत्र दिसणार असतानाच आधीच्या वादासंदर्भात विराटने स्पष्टपणे आपली भूमिका भारतीय क्रिकेट नियामक मंडळासमोर मांडल्याचं वृत्त 'क्रिकबझ'ने दिलं आहे. आमच्यातील वादाचा परिणाम खेळावर आणि संघावर होणार नाही असं विराटने बीसीसीआयला कळवलं आहे. विराट कोहलीने गंभीरबरोबर भूतकाळात झालेल्या वादांचा परिणाम भारतीय संघामध्ये त्यांच्या असलेल्या खेळाडू आणि प्रशिक्षक या नात्यावर होणार नाही असं बीसीसीआयला सांगितलं आहे. भारतीय संघाला जास्तीत जास्त फायदा होईल अशी कामगिरी करण्याचा मानस या दोघांचा असल्याने बोर्डाने फारशी चिंता करण्याची गरज नसल्याचे समजते.
नक्की वाचा >> मिळालं नाहीये मिळवलंय... सूर्यकुमार यादवच्या कर्णधारपदाची आकडेवारी, Winning Percentage पाहून बसेल धक्का
खरं तर गंभीर आणि विराट हे दोघेही फारच दिलदार म्हणून ओळखले जातात. मैदानावर अगदी आक्रमकपणे खेळणारे दोघेही इतर वेळेस शांत असतात. गंभीर आणि कोहलीने आयपीएलमध्ये आपआपल्या संघाचं नेतृत्व केलं आहे. गंभीर तर आता आयपीएलमध्ये वरिष्ठ खेळाडू म्हणून मेंटॉरपद संभाळत होता. गंभीर आणि कोहलीमध्ये मैदानात वाद झाल्याचं पाहाला मिळालं आहे. मात्र गंभीर केकेआरचा मेंटॉर झाल्यानंतर 2024 च्या आयपीएलच्या एका सामन्यात विराट आणि गंभीरने मिठी मारत त्यांच्यामध्ये सर्वकाही ठिक असल्याचं अधोरेखित केलं.
काही महिन्यांपूर्वीच गंभीरने विराटबरोबरच्या नात्यावर भाष्य केलं. आमच्या दोघांमध्ये नेमका बॉण्ड कसा आहे हे देशाला ठाऊक नसल्याचं गंभीर म्हणाला. "जे काही वाटतं ते प्रत्यक्षात जशी स्थिती आहे त्याहून फारच वेगळं आहे. माझं विराटबरोबरचं नातं हे देशाला फारसं ठाऊक नाही. आपआपल्या संगाचं नेतृत्व करताना व्यक्त होण्याचा त्याला माझ्याइतकाच हक्क आहे. आमचं नातं हे लोकांना (वादाचा) मालमसाला देण्यासाठी नाहीये," असं गंभीरने सांगितलं होतं.
नक्की वाचा >> गंभीरसमोर BCCI ला नमतं घ्यावच लागलं! साधं कॉन्ट्रॅक्टही न केलेला खेळाडू टीम इंडियात
विराटनेही आपण गंभीर आणि नवीन उल-हकला मिठी मारल्यानंतर अनेकांची निराशा झाली होती असं म्हटलं होतं. "माझ्या वागण्याने लोक निराश झाले होते. मी नवीन आणि दुसऱ्या दिवशी गौती भाईला मिठी मारली," असं विराटने प्युमाच्या कार्यक्रमात म्हटेललं.
खरं तर श्रीलंकन दौऱ्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली सहभागी होणार नव्हते. मात्र गौतम गंभीरने त्यांना ही मालिका खेळण्यासंदर्भात विनंती केल्यानंतर दोघांनाही होकार दिल्याचे समजते.