India tour of Sri lanka | टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यात बदल, जाणून घ्या नवे वेळापत्रक

या मालिकेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.  

Updated: Jul 10, 2021, 04:08 PM IST
India tour of Sri lanka | टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यात बदल, जाणून घ्या नवे वेळापत्रक title=

कोलंबो :  टीम इंडियाचा युवा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडिया शिखर धवनच्या नेतृत्वात वनडे आणि टी 20 सीरिज खेळणार आहेत. या वनडे सीरिजला 13 जुलैपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी या मालिकेच्या वेळापत्रकात बदल झाले आहे. श्रीलंकाचे बॅटिंग कोच  ग्रॅन्ट फ्लॉवर यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे परिणामी ही एकदिवसीय मालिका 5 दिवसांनी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती बीसीसीआय सचिव जय शाह यांनी एएनआयसोबत बोलताना दिली आहे. (India tour Sri Lanka ODI series to start to 18 July due to covid 19 says  bcci secretary Jay Shah)

याआधी 9 जुलैला बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने वनडे सीरिज पुढे ढकलण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र आता जय शाहने याबाबतची घोषणा केली आहे. त्यानुसार आता 18 जुलैपासून या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. एकूण 3 सामन्यांची ही मालिका असणार आहे.

वनडे सीरिजमध्ये बदल केल्याने त्याचा थेट परिणाम हा टी  20 सीरिजवरही झाला आहे.  21 जुलैपासून सुरु होणाऱ्या या सीरिजला  4 दिवसांच्या विलंबाने सुरुवात होणार आहे. 25 जुलैपासून या मालिकेचा प्रारंभ होणारे.  

वनडे आणि टी 20 सीरिजचे वेळापत्रक

सुधारित वेळापत्रक 18, 20 आणि 23 जुलैला अनुक्रमे 3 एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहेत. तर यानंतर टी 20 मालिकेतील 3 सामने हे  25, 27 आणि 29 जुलैला पार पडणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सर्व सामने एकाच मैदानात खेळवण्यात येणार आहेत. त्यानुसार या सामन्यांचे आयोजन हे आर प्रेमदासा स्टेडियममध्ये करण्यात आले आहे.  

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडिया

शिखर धवन (कॅप्टन), भुवनेश्वर कुमार, पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.