भारत-ऑस्ट्रेलिया पहिली वनडे : भारतापुढे ऑस्ट्रेलियाचं आव्हान

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पहिला सामना

Updated: Jan 14, 2020, 08:52 PM IST
भारत-ऑस्ट्रेलिया पहिली वनडे : भारतापुढे ऑस्ट्रेलियाचं आव्हान title=

मुंबई : भारताविरुद्धच्या पहिल्या वनडे मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच याने पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. भारताकडून रोहित शर्मा, शिखर धवन आणि केएल राहुल या तिन्ही ओपनरना संधी देण्यात आली आहे. तर केदार जाधव आणि नवदीप सैनीला मात्र स्थान मिळालेलं नाही. ऑस्ट्रेलियाकडून टेस्ट क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मार्नस लॅबुशेनने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे.

भारतीय टीम

रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

ऑस्ट्रेलियन टीम 

डेव्हिड वॉर्नर, एरॉन फिंच, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, एश्टन टर्नर, एलेक्स कारे, एश्टन अगर, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, केन रिचर्डसन, एडम झम्पा

याआधी फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर आली होती. यावेळी वनडे सीरिजच्या पहिल्या २ मॅच जिंकल्यानंतर भारताने उरलेल्या तिन्ही मॅच गमावल्या, त्यामुळे ऑस्ट्रेलियाने सीरिज खिशात टाकली.

मागच्या वर्षी भारतात आलेल्या ऑस्ट्रेलियन टीमच्या तुलनेत यंदाची टीम जास्त मजबूत आहे. ऑस्ट्रेलियाच्या यंदाच्या टीममध्ये डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांचं पुनरागमन झालं आहे. बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी वॉर्नर आणि स्मिथ यांचं एका वर्षासाठी निलंबन केल्यामुळे दोघांना मागच्या भारत दौऱ्यासाठी येता आलं नव्हतं.

ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानात टेस्ट सीरिजमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंडला व्हाईट वॉश केलं. याआधी वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्येही ऑस्ट्रेलियाने मजल मारली होती. इंग्लंडविरुद्धची ऍशेस सीरिजही ऑस्ट्रेलियाने ड्रॉ केली होती. स्मिथ आणि वॉर्नर तसंच नव्याने टीममध्ये दाखल झालेला मार्नस लॅबुशेन हे खोऱ्याने रन काढत आहेत.

दुसरीकडे भारताची टीमही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाप्रमाणेच भारतानेही वर्ल्ड कपची सेमी फायनल गाठली होती. वर्ल्ड कपनंतर वेस्ट इंडिज दौऱ्यात, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेच्याविरुद्ध घरच्या मैदानात भारताने सीरिज जिंकल्या.