27 वर्षांत जे घडलं नाही ते केलं तरच...; Ind vs Aus सामन्याआधीच समोर आली धक्कादायक आकडेवारी

India vs Australia Record At Mohali Ground: भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळवल्या जाणाऱ्या 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज पंजाबमधील मोहाली येथे खेळवला जाणार आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 22, 2023, 09:33 AM IST
27 वर्षांत जे घडलं नाही ते केलं तरच...; Ind vs Aus सामन्याआधीच समोर आली धक्कादायक आकडेवारी title=
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आज पहिला सामना

India vs Australia Record At Mohali Ground: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेआधी खेळवण्यात येत असलेल्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच शुक्रवारी, 22 सप्टेंबर रोजी पंजाबमधील मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर होणार आहे. दुपारी दीड वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज असून पहिल्या 2 सामन्यांमध्ये संघाची धूरा के. एल. राहुलच्या हाती असणार आहे. जखमी असल्याने संघाबाहेर असलेल्या के. एल. राहुलने आशिया चषकामधून दमदार पुनरागमन केलं. त्यामुळे आता तो नेतृत्व कसं करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

तो ऐतिहासिक सामना सचिनने जिंकून दिलेला

भारत आणि ऑस्ट्रेलिया मोहालीच्या मैदानात सहाव्यांदा एकदिवसीय सामना खेळणार आहेत. यापूर्वी दोन्ही संघ मोहालीमध्ये एकूण 5 वेळा आमने-सामने आले आहेत. मात्र या मैदानातील आकडेवारी पाहिल्यास यजमान संघाऐवजी पाहुणेच सरस ठरले आहेत. भारताने या मैदानावरील 5 पैकी 4 सामने गमावेल असून एकाच सामन्यात विजय मिळवला आहे. भारतीय संघाला 1996 साली खेळवण्यात आलेल्या सामन्यात या मैदानात ऑस्ट्रेलियास पराभूत करण्यात यश आलं होतं. त्यावेळी सचिन तेंडुलकरने शेवटच्या ओव्हरमध्ये 6 धावा हव्या असताना भन्नाट गोलंदाजी करत भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला होता. म्हणजेच आज भारताला तब्बल 27 वर्षांचा विजयाचा दुष्काळ संपवण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.

सलग 4 सामन्यांमध्ये पराभव

भारतीय संघ मोहालीमध्ये सलग 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला आहे. त्यामुळेच पराभवाचं हे दुष्टचक्र संपवण्याच्या इराद्याने आणि ऐताहिसिक कामगिरी करण्यासाठीच राहुलच्या नेतृत्वाखालील संघ मैदानात उतरणार आहे. या सामन्याबरोबरच मालिकेतील दुसऱ्या सामन्यामध्येही भारतीय संघ के. एल. राहुलच्या नेतृत्वाखालील खेळणार आहे. तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात बदल पहायला मिळतील. 

एकंदरित आकडेवारी काय सांगते?

एकदिवसीय क्रिकेटची एकंदरित आकडेवारी पाहिल्यास भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ एकमेकांविरोधात 146 सामने खेळले आहेत. यापैकी 84 सामने ऑस्ट्रेलिया जिंकलेत. तर भारताने 54 सामने जिंकले आहेत. 10 सामन्यांचा कोणताही निकाल लागला नाही. या आकडेवारीमध्येही ऑस्ट्रेलियन संघ भारतापेक्षा बराच पुढे आहे. मात्र भारतीय मैदानावर सामना असल्याने कांगारुंना भारतीय संघाला पराभूत करणं आव्हानात्मक ठरणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच दोन्ही संघ एकमेकांविरोधात 3 सामन्यांची मालिका खेळले होते. या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाने 0-1 ने मागे पडल्यानंतर 2-1 ने मालिका जिंकली होती. 

पहिल्या 2 सामन्यांसाठी भारतीय संघ:

के.एल. राहुल (कर्णधार, विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, वॉशिंगटन सुंदर, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल (दुखापतीमधून बरा झाला तर), वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

भारताविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ -

पॅट कमिन्स (कप्तान), सीन एबॉट, अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमरन ग्रीन, जोश हेजलवुड, जोश इंग्लिश, स्पेन्सर जॉनसन, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मैथ्यू शॉर्ट, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेविड वॉर्नर, अॅडम जाम्पा.

कधी आणि कुठे खेळवले जाणार हे सामने?

पहिला वनडे सामना- 22 सप्टेंबर - मोहाली
दुसरा वनडे सामना- 24 सप्टेंबर - इंदूर
तीसरा वनडे सामना- 27 सप्टेंबर - राजकोट