मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या तिसऱ्या टेस्ट मॅचला २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या सीरिजमधली पहिली टेस्ट भारतानं जिंकली तर दुसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाला. त्यामुळे ४ टेस्ट मॅचची सीरिज आता १-१नं बरोबरीत आहे. तिसऱ्या टेस्टमध्ये ज्या टीमचा विजय होईल ती टीम ही सीरिज गमावू शकणार नाही. २०१८ या वर्षातली या दोन्ही टीमची ही शेवटची मॅच असेल, त्यामुळे दोन्ही टीम वर्षाचा शेवट गोड करण्यासाठी मैदानात उतरतील. भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीला या टेस्ट मॅचमध्ये एक-दोन नाही तर तब्बल १० रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे.
वर्षाच्या सुरुवातीच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील ३ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये विराटनं सर्वाधिक २८६ रन केले होते. त्यानंतरच्या इंग्लंड दौऱ्यातल्या ५ टेस्टमध्ये विराटनं रेकॉर्ड ५९३ रनचा डोंगर उभारला. ऑस्ट्रेलियामधल्या पहिल्या टेस्टमध्ये विराटला मोठी धावसंख्या उभारतला आली नाही. पण पर्थमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये विराटनं २५वं शतक केलं. या मॅचमध्ये विराटनं २५७ बॉलमध्ये १२३ रनची खेळी केली.
एका वर्षामध्ये सगळ्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक रन करण्यासाठी विराटला आणखी १८१ रनची गरज आहे. विराट कोहलीनं या वर्षात टेस्ट, वनडे आणि टी-२० मिळून २,६५३ रन केले आहेत. एका वर्षात सर्वाधिक रन करण्याचं रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉटिंगच्या नावावर आहे. पॉटिंगनं २००५ साली २,८३३ रन केले होते.
तिसऱ्या टेस्टमध्ये विराटनं शतक केलं तर एका वर्षात सर्वाधिक शतकं करण्याच्या सचिनच्या रेकॉर्डशी तो बरोबरी करेल. सचिन तेंडुलकरनं १९९८ मध्ये १२ शतकं केली होती. विराटनं यावर्षी टेस्टमध्ये ५ आणि वनडेमध्ये ६ अशी एकूण ११ शतकं केली आहेत.
विराटनं या टेस्टमध्ये शतक केलं तर तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्टमध्ये सर्वाधिक शतक करणारा दुसरा भारतीय ठरेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्टमध्ये विराटची ७, सुनील गावसकर यांची ८ आणि सचिन तेंडुलकरची ११ शतकं आहेत.
भारताबाहेर टेस्टमध्ये एका वर्षात सर्वाधिक रन करण्याचं रेकॉर्ड बनवण्यासाठी कोहलीला ८२ रनची आवश्यकता आहे. सध्या हे रेकॉर्ड राहुल द्रविडच्या नावावर आहे. द्रविडनं २००२ साली परदेशामध्ये १,१३७ रन केले होते. विराटनं २०१८ मध्ये परदेशातल्या टेस्टमध्ये १,०६५ रन केले आहेत.
परदेशामध्ये एका वर्षात सर्वाधिक रन बनवणारा कर्णधार होण्यासाठी विराटला १५६ रनची गरज आहे. सध्या हे रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅम स्मिथच्या नावावर आहे. स्मिथनं २००८ साली २० इनिंगमध्ये १,२१२ रन केले होते.
या मॅचमध्ये विराटनं शतक केलं तर तो टेस्टमध्ये एकूण शतकांच्या गॅरी सोबर्स यांच्या रेकॉर्डशी बरोबरी करेल. विराट कोहलीनं आत्तापर्यंत २५ टेस्ट शतकं तर सोबर्स यांनी २६ टेस्ट शतकं केली आहेत. या यादीत सचिन तेंडुलकर ५१ शतकांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
तिसऱ्या टेस्टमध्ये विराटनं शतक केलं तर त्याची ऑस्ट्रेलियामध्ये ५ शतकं होतील. ऑस्ट्रेलियामध्ये ४ शतकं करणारे क्लाईव्ह लॉईड यांचा रेकॉर्ड विराट मोडेल.
ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक रन करणारा दुसरा परदेशी कर्णधार व्हायला विराटला १२३ रनची गरज आहे. विराटच्या नावावर ऑस्ट्रेलियामध्ये ६२६ रन आहेत. या यादीमध्ये क्लाईव्ह लॉईड (१,३०१), ग्रॅम स्मिथ(७४८) आणि आर्ची मॅकलेरन(७०९) यांचा समावेश आहे.
या टेस्टमध्ये भारतीय टीमचा विजय झाला तर, विराट कोहली सौरव गांगुलीच्या रेकॉर्डशी बरोबरी करेल. आशिया खंडाबाहेर विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतानं ५ टेस्ट मॅच जिंकल्या आहेत. फक्त सौरव गांगुलीनं आशिया खंडाबाहेर ६ टेस्ट मॅच जिंकण्याचा विक्रम केला आहे.
या टेस्टमध्ये विराटनं शतक केलं तर तो सर्वाधिक शतक करणारा तिसरा खेळाडू ठरेल. सध्या ६३ शतकांसोबत विराट कोहली कुमार संगकाराबरोबर तिसऱ्या क्रमांकावर आहे. या दोघांच्या पुढे फक्त रिकी पॉटिंग (७१ शतकं) आणि सचिन तेंडुलकर(१०० शतकं) आहे.